अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिराचं सोमवारी (२३ जानेवारी) उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटना आणि नेते आता काशी, मथुरा आणि ज्ञानवापी मशिदींच्या जागेवर मंदिरं बांधण्याची भाषा बोलू लागले आहेत. भाजपा नेते आणि माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनीदेखील असाच सूर आळवला आहे. काशी विश्वनाथ मंदीर आणि कृष्ण जन्मभूमी मंदिरप्रकरणी स्वामी सक्रीय झाले आहेत. स्वामी म्हणाले, ही दोन्ही प्रकरणं घेऊन मी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार आहे. मी याप्रकरणी आधीच याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर लवकरात लवकर सुनावणी घेतली जावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, अशा प्रकरणांमध्ये नरेंद्र मोदी केवळ श्रेय घेतात, असा आरोपही स्वामी यांनी केला आहे.
सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मंगळवारी (२३ जानेवारी) एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ज्ञानवापी काशी विश्वनाथ मंदिर आणि कृष्ण जन्मभूमी मथुरा मंदिर पुन्हा बांधण्याची परवानागी मिळावी यासाठी माझी ‘प्लेस ऑफ वर्शिप’ ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर त्यांच्या पटलावर घ्यावी यासाठी मी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे. मोदी आता काहीच करणार नाहीत. परंतु, नंतर श्रेय लाटण्यासाठी धावत येतील.
भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना, मंत्र्यांना राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. परंतु, राम मंदिरासाठी आंदोलन करणाऱ्या सुब्रह्मण्यम स्वामी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं नव्हतं. याबाबत स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही महिन्यांपूर्वी सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले होते की, माझ्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये छापण्यास बंदी घातली आहे. मी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला जाणार नाही, कारण मला निमंत्रण पाठवलेलं नाही. अशोक सिंघल यांनी सांगितल्याप्रमाणे मी राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. त्यानंतर यासाठी न्यायालयात लढा दिला.
हे ही वाचा >> श्रीरामाच्या दर्शनासाठी लोटला जनसागर, गर्दी नियंत्रणाबाहेर, पोलीस म्हणाले, “अयोध्येला येऊ नका, आता थेट…”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेपूर्वी ११ दिवसांचं व्रत ठेवलं होतं. तसेच प्राणप्रतिष्ठेनंतर ते भावूक झाले होते. यावरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधत स्वामी म्हणाले होते, पंतप्रधान खरंच राम आणि राम मंदिराबाबत इतके गंभीर असतील तर त्यांनी रामसेतूला राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून घोषित करावं. गेल्या १० वर्षांपासून त्याचं घोंगडं भिजत पडलं आहे.