केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेती क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी पेट्रोल-डिझेलवर उपकर घेतला जाणार असल्याची घोषणा केली. पेट्रोलवर प्रति लिटर अडीच रुपये, तर डिझेलवर प्रति लिटर चार रुपये उपकर आकारला जाणार आहे. मात्र उत्पादन शुल्कात कपात झाल्यामुळे वाढीव अधिभाराचा भरूदड मध्यमवर्गाला बसणार नाही, असा दावा सरकारने केला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरीलमूलभूत उत्पादन शुल्क आणि विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्काचे दर कमी करण्यात आले आहेत. मात्र या उपकरासंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून या दरवाढीला विरोध होताना दिसत आहेत. त्यातच भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला इंधन दरवाढीवरुन घरचा आहेर दिलाय.

नक्की वाचा >> Budget 2021 : “पेट्रोल-डिझेल १००० रुपये लिटर करुन मोदी सरकारला लोकांना मारायचं असेल”

सध्या मुंबईसह राज्यातील अनेक शहरात पेट्रोल लिटरमागे ९३ रुपयांपुढे, तर डिझेल ८३ रुपयांपुढे गेले आहे. उत्पादन शुल्कात कपातीनंतर, पंपांवर विक्री केल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे १.४ रुपये आणि १.८ रुपये प्रतिलिटर असे मूलभूत उत्पादन शुल्क आकारण्यात येणार आहे. पेट्रोलवर प्रति लिटर ११ रुपये तर डिझेलवर प्रति लिटर आठ रुपये विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क असेल. ब्रॅण्डेड पेट्रोल आणि डिझेलसाठीही त्याच प्रकारचे बदल करण्यात आले आहेत.

इंधन दरवाढीवरुन निशाणा साधताना सुब्रमण्यम स्वामी यांनी श्री रामाच्या भारतामध्ये पेट्रोल ९३ रुपये लिटर आहे. सीता मातेच्या नेपाळमध्ये ५३ रुपये लिटर आहे तर रावणाच्या लंकेत ५१ रुपये लिटर पेट्रोल आहे, असा मजकूर असणारा फोटो शेअर केला आहे.

मात्र स्वामी यांनी केलेल्या या दावाव्यावर एका फॉलोअरने तुम्ही केलाला दावा चुकीचा असून नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडूमध्ये पेट्रोल १०९ रुपये प्रती लिटर तर श्रीलंकेची राजधानी असणाऱ्या कोलंबोमध्ये पेट्रोल १७१ रुपये प्रती लिटर असल्याचं म्हटलं आहे.

काल उपकर वाढवण्यात येण्याची बातमी समोर आल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही पेट्रोल-डीझेलचे दर वाढणार नसून याचा सर्वसामान्यांना फटका बसणार नाहीय, असं स्पष्ट केलं होतं.

Story img Loader