Sri Lanka crisis : श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटादरम्यान भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी सरकाला इशारा दिला आहे. श्रीलंकेतील परिस्थिती बघता येथील नागरीक भारतात निर्वासित होण्याची शक्यता आहे. संदर्भात भारताला काळजी घ्यावी लागेल, असे स्वामी यांनी म्हटले आहे.
स्वामी यांनी ट्वीट करत श्रीलंकेतील आंदोलकांवर टीका केली आहे. ”श्रीलंकेतील नेत्यांच्या घरावर होणारे आक्रमण आणि येथील नागरिकांकडून ट्वीटरवरील द्वेषपूर्ण भाषण बघता, श्रीलंकेतील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ट्विटरवर श्रीलंकेतील आक्रमक जमाव अश्लील आणि असभ्य भाषा वापरत आहे. सुसंस्कृत श्रीलंकेने या झुंडशाहीला विरोध करून त्यांना त्यांची जागा दाखवावी”, असे ट्वीट स्वामी यांनी केले आहे.
तसेच स्वामी यांनी श्रीलंकेला सैन्य मदत देण्याचे समर्थन केले आहे. ”गोटाबाया आणि महिंदा राजपक्षे हे दोघेही निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. जर राजपक्षे यांना भारताची सैन्या मदत हवी असेल, तर ती भारताने द्यायला हवी”, असेही ते म्हणाले.
श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या राजकीय आणि आर्थिक संकटामुळे तिथून अवैध स्थलांतर रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दल श्रीलंकेच्या सागरी सीमेवर हाय अलर्टवर आहे. तेथे सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे बेकायदा स्थलांतर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय तटरक्षक दलाने रामेश्वरमजवळील मंडपम तळावर हॉवरक्राफ्ट तैनात केले आहे.
दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे १३ जुलै रोजी राजीनामा देणार असून त्यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना याबाबत माहिती दिली आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.