भागधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘सेबी’च्या तडाख्यात सापडलेले सहारा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना जामीन मिळविण्यासाठी परदेशातील आपली तीन पंचतारांकित हॉटेल विकावी लागणार आहेत. या हॉटेलची विक्री प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी दोन आठवडे लागतील, असे रॉय यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सांगितल्याने त्यांना १५ दिवसांची आणखी मुदत देण्यात आली आहे.

सुब्रतो रॉय यांना भागधारकांचे बुडविलेले १९००० कोटी परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पैसे उभे करण्यासाठी रॉय यांनी लंडन आणि न्यूयॉर्कमधील आपली हॉटेल विकण्याचा निर्णय घेतला. या हॉटेलची विक्री प्रक्रिया सुरू असून, ते पंधरवडय़ात पूर्ण होईल, असे रॉय यांचे वकील टी. एस. ठाकूर यांनी न्यायालयात सांगितले. गेल्या आठवडय़ात काही खरेदीदारांनी ही मालमत्ता घेण्याची तयारी दाखविली होती. मात्र त्यांच्याशी कोणताही करार होऊ शकला नाही. अजूनही काही परदेशी खरेदीदार ही मालमत्ता खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. १५ दिवसांत ही हॉटेल विकली जातील, असे ठाकूर यांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, रॉय यांच्या मालकीच्या या हॉटेलची विक्री बाजारभावापेक्षा कमी किमतीत केली जाऊ नये, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.
ब्रुनेईचे सुलतान ही तीनही हॉटेल विकत घेण्यास इच्छुक आहेत, अशी बातमी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात आल्यानंतर या हॉटेलच्या बाहेर मोठे आंदोलन झाले होते, हे न्यायालयात सांगण्यात आले.

Story img Loader