|| सुकृता बारुआ
साना नियाझचे बारावी परीक्षेत यश
मातिया महल परिसरातील अल जवाहर या उपाहारगृहात वडील आचारी, आई गृहिणी आणि तीन बहिणी अशा परिवारातील साना नियाझ या दिल्ली सरकारी शाळेतील विद्यार्थिनीने सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावून आपल्या तीन बहिणींपैकी एकीच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.
सवरेदय कन्या विद्यालय, जामा मशीद शाळेतील नियाझने परीक्षेमध्ये ९७.६ टक्के गुण मिळवून दिल्ली सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या तीन बहिणीही याच शाळेतील विद्यार्थिनी असून त्यापैकी एकीने तिच्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता तर अन्य दोघी बहिणींनीही लक्षणीय यश मिळविले आहे.
आपल्याला कधीही शिकवणीला जावे लागले नाही कारण मार्गदर्शन करण्यासाठी बहिणी होत्या. आपल्या बहिणींनी शिक्षणाचा जो दर्जा स्थापित केला तो आपल्याला अबाधित ठेवावयाचा होता. रियाझने मिळविलेल्या यशाबद्दल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अभिनंदनाचा दूरध्वनी केला तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला, अशी प्रतिक्रिया नियाझच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
नियाझला सेंट स्टीफन्स महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेण्याची आणि नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याची इच्छा आहे. नियाझची धाकटी बहीण इयत्ता नववीत शिकत असून आता तिच्यावर हा शैक्षणिक दर्जा टिकविण्याची जबाबदारी आहे.