एकाग्रतेतील व्यत्यय टाळण्यासाठी ‘यूपीएससी’च्या यशवंतांची खातीही निष्क्रिय

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल ठरलेल्या विशीतल्या तरुणांची माहिती तुम्हाला कुठे मिळेल? ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंक्डइन या समाज माध्यमांवर, असे जर तुमचे उत्तर असेल तर ते चूक आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) अव्वल ठरलेल्या बहुतांश तरुणांमध्ये एक गोष्ट सामायिक आहे. अभ्यासातील ‘व्यत्यय’ टाळण्यासाठी आणि परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते सर्वजण समाजमाध्यमांपासून दूर राहिले. त्यांच्यापैकी अनेकांनी तर त्यांची खाती निष्क्रिय (डीअ‍ॅक्टिव्हेट) केली. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात त्यांना ऑनलाइन शोधणे कठीण आहे.

‘हा वेळेचा अपव्यय आहे, असे मला वाटले. मी माझे फेसबुक आणि ट्विटरचे खाते निष्क्रिय केले. मी इन्स्टाग्रामवर आहे, पण क्वचित पाहतो आणि त्यावरही मी फक्त माझ्या जवळच्या काही लोकांशी संवाद साधतो, असे या परीक्षेत देशात पहिला आलेल्या कनिष्क कटारिया याने सांगितले. चौथा आलेला राजस्थानचा श्रेयांश कुमट, भोपाळची सृष्टी देशमुख (पाचवी) आणि विलासपूरचा वर्णित नेगी (तेरावा) यांनीही असेच केले आहे. कर्नाटकमधून पहिला आणि देशभरातून सतरावा आलेल्या राहुल संकानुर याने तर स्मार्टफोनही वापरला नाही. माझ्याजवळ आता स्मार्टफोन आला असून मी तो वापरणे सुरू केले आहे, असे त्याने ‘संडे एक्स्प्रेस’ला सांगितले.

मात्र, आपण काही समाजमाध्यमांचा वापर केल्याचे या परीक्षेत दहावा आलेला २६ वर्षांचा आयपीएस अधिकारी तन्मय शर्मा याने सांगितले. ट्विटर नाही, पण परंतु इंडियन एक्स्प्रेससारख्या वृत्तपत्रांची पाने पाहण्यासाठी मी फेसबुक वापरले, असे तो म्हणाला. ‘व्हॉट्सअ‍ॅपवर काही स्टडी ग्रुप होते, केवळ त्यामुळे मी ते वापरले,’ असे जयपूरच्या अक्षत जैनने सांगितले.

५० पैकी २७ अभियंते

‘यूपीएससी’च्या गुणवंतांमध्ये आणकी एक गोष्ट सामायिक आहे. ती म्हणजे ५० पैकी किमान २७ अभियंते आहेत. त्यांत आयआयटी, मुंबईच्या पाच गुणवंतांसह अन्य आयआयटी पदवीधारकांचाही समावेश आहे. उल्लेखनीय गोष्ट अशी की या वेळच्या बुद्धिवंतांमध्ये एमबीए पदवीधारक नाही.

खासगी नोकरीचाही त्याग : नागरी सेवेत जाण्यासाठी या गुणवंतांपैकी अनेकांनी खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचाही त्याग केला. कटारियाने वर्षभराहून अधिक काळ दक्षिण कोरियात सॅमसंगमध्ये काम केले. कुमट याने नागरी सेवा परीक्षांच्या तयारीचा निर्णय घेण्यापूर्वी दोन वर्षे अर्न्स्ट अ‍ॅण्ड यंग कंपनीत काम केले होते.