नवी दिल्ली/बेंगळुरू : अवकाशात सोडलेल्या स्पा-डेक्स उपग्रहांची ‘डी-डॉकिंग’ (एकमेकांपासून वेगळे) प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे. भविष्यातील चांद्रमोहिमा, अवकाशातील मानवी मोहिमांसाठीचा मार्ग त्यामुळे मोकळा झाल्याचे ‘इस्राो’ने म्हटले आहे.
‘इस्रो’ने पहिल्याच प्रयत्नात १३ मार्च रोजी ‘अनडॉकिंग’ची प्रक्रिया पूर्ण केली. आता या दोन्ही उपग्रहांची स्थिती सामान्य आहे. बेंगळुरू, लखनौ आणि मॉरिशस येथील केंद्रांवरून या मोहिमेवर लक्ष ठेवण्यात आले. येत्या काही दिवसांत आणखी काही प्रयोग इस्राो या उपग्रहांवर करणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘इस्राो’च्या या यशस्वी प्रयोगाची गुरुवारी ‘एक्स’वर टिप्पणी करून घोषणा केली.
ते म्हणाले, ‘स्पा-डेक्स उपग्रहांनी अविश्वसनीय असे डी-डॉकिंग पूर्ण केले आहे. भविष्यातील अवकाशातील मोहिमा त्यामुळे सुरळीत पार पडण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामध्ये भारतीय अंतराळ स्थानक, चांद्रयान-४ आणि गगनयान मोहिमांचाही समावेश आहे. ‘इस्राो’चे अभिनंदन.’
‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन यांनीही या यशाबद्दल शास्त्रज्ञांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, ‘‘इस्राो’च्या इतिहासात ही आणखी एक मोठी उपलब्धी ठरली आहे. उपग्रहांचे यशस्वीपण आम्ही ‘डी-डॉकिंग’ केले आहे. त्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न मी समजू शकतो.’
स्पा-डेक्स मोहीम गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली. या मोहिमेमध्ये ‘एसडीएक्स-०१’ आणि ‘एसडीएक्स-०२’ असे प्रत्येकी २२० किलो वजनाचे दोन स्पा-डेक्स उपग्रह वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आले. या मोहिमेत संशोधन आणि विकासासाठी आणखी २४ ‘पे-लोड’ आहेत. ही केवळ एकच स्पाडेक्स मोहीम नसेल, तर नंतर अनेक अशा मोहिमा होणार आहेत.