पीटीआय, बंगळुरू : तमिळनाडूच्या महेंद्रिगिरी येथे भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या (इस्रो) प्रणोदन संकुलातील (प्रोपल्शन कॉम्प्लेक्स-आयपीआरसी) अति उच्च पातळी चाचणी केंद्रात (हाय अल्टिटय़ूड सेंटर) ‘सीई-२० इंजिन’ची घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाल्याचे ‘इस्रो’तर्फे शनिवारी जाहीर करण्यात आले. हे ‘इस्रो’चे सर्वात अवजड प्रक्षेपक यंत्र आहे.

त्याचा उपयोग ‘एलव्हीएम३-एम ३’ मोहिमेसाठी करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ‘वनवेब इंडिया-१’च्या आणखी ३६ उपग्रहांना प्रक्षेपित केले जाणार आहे. लंडन येथील दूरसंचार उपग्रह क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘वनवेब’ कंपनीच्या या उपग्रहांना ‘इस्रो’ची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) पुढील वर्षांच्या प्रारंभी प्रक्षेपित करेल.

२३ ऑक्टोबरला ‘एनएसआयएल’तर्फे श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून ‘वन वेब’च्या पहिल्या टप्प्यातील ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर ‘सीई-२०’ या उपग्रह प्रक्षेपकाच्या अवजड यंत्राच्या प्रक्षेपणासंबंधित चाचणी शुक्रवारी यशस्वीरीत्या घेण्यात आली. ‘लाँच व्हेईकल मार्क-३’ हे ‘इस्रो’चे सर्वात वजनदार उपग्रह प्रक्षेपक आहे. चार टन वजनश्रेणीतील उपग्रहास भूस्थिर कक्षेत सोडण्याची त्याची क्षमता आहे.