वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय नौदलाने बुधवारी के-४ अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. यामुळे भारताची आण्विक प्रतिकारक्षमता आणि संरक्षणसिद्धता अधिक वाढली आहे. नौदलाच्या ‘आयएनएस अरिघात’ या अणुऊर्जासंचिलात पाणबुडीमधून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. ते ३,५०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा भेद करू शकते.

ही चाचणी व्यापक आण्विक प्रतिकारक्षमता विकसित करण्याच्या भारताच्या योजनेमधील मैलाचा दगड ठरणार आहे. शत्रूने अण्वस्त्र हल्ला केल्यास याद्वारे त्याला प्रभावी प्रत्युत्तर देता येणार आहे. तसेच सागरी हद्दीच्या पलिकडेही देशाच्या सीमांचे संरक्षण करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा >>>OTP Messages : १ डिसेंबरपासून OTP मेसेज मिळण्यास विलंब होणार? नेमकी कारणं काय? जाणून घ्या!

घन इंधनावर चालणारे के-४ क्षेपणास्त्र अण्वस्त्रक्षम पाणबुडीवरून सोडले जाणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (एसएलबीएम) असून नौदलाला अण्वस्त्रांविरोधात प्रभावी अस्त्र उपलब्ध करून देण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. ते ज्या ‘आयएनएस अरिघात’वरून सोडण्यात आले ती भारताची दुसरी अणुऊर्जासंचिला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी(एसएबीएन) आहे.