अभिनेते प्रकाश राज यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जेवढं नाव कमावलं आहे तेवढंच नाव त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही कमावलं आहे. सिंघम मधल्या जयकांत शिक्रेमुळे तर ते घराघरात पोहचले. त्यांच्या नकारात्मक भूमिका विशेष गाजल्या आहेत. त्यांच्या भूमिका जशा चर्चेत असतात तसेच त्यांचे ट्विट्सही चर्चेत असतात. चांद्रयान ३ च्या लँडिंगपूर्वी प्रकाश राज यांनी इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे नेटकरी त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत.
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून देशभरातले खगोलप्रेमी हे आस लावून बसले आहेत. तसंच अनेक लोकांकडून प्रार्थनाही केली जाते आहे. अशात प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन इस्रो चे माजी प्रमुख के सिवन हे चहा ओतत असल्याचं व्यंगचित्र शेअर केलं आहे. विक्रम लँडरकडून पहिला फोटो वॉव असं म्हणत त्यांनी या मोहिमेची खिल्ली उडवली आहे. ज्यानंतर त्यांच्यावर चांगलीच टीका होते आहे.
प्रकाश राज हे त्यांच्या वादग्रस्त ट्विट्समुळे कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवल्याने विविध नेटकऱी आपल्या पद्धतीने त्यांच्यावर संताप व्यक्त करत आहेत.
अभिनेते प्रकाश राज यांना त्यांच्या ट्विटसाठी प्रचंड ट्रोल केले जात आहे. नेटकऱ्यांनी प्रकाश राज यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. राम नावाच्या एका युजरने इस्रो गौरवशाली भारताचे प्रतिनिधित्व करते. तुटपुंजे संसाधने आणि निराशावादी वातावरण असतानाही अनेक मोठी कामगिरी करून दाखवली आहे. काही मोजक्याच देशांनी साध्य केले ते इस्त्रोने मिळवून दाखवलं आहे. आता जगातील काही मोजक्या संस्थामध्ये इस्रोचाही समावेश होतो. हा माणूस भारताचील सर्वात वाईट गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो. ज्या राष्ट्राने त्याला खूप काही दिले त्या राष्ट्राचा तिरस्कार करतो.. असे म्हटले आहे.