Suchana Seth Killed 4 Year Old Son Update: चार वर्षांच्या मुलाच्या हत्येचा आरोप असलेल्या एआय स्टार्टअपच्या सीईओ सुचना सेठच्या पोलीस कोठडीत सोमवारी पाच दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. सहा दिवसांची प्राथमिक कोठडी संपल्यानंतर सेठला गोवा बाल न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे, अद्याप गुन्ह्याचा हेतू समजलेला नसल्याने चौकशीसाठी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सूचना व तिचा विभक्त पती व्यंकट रमण याने दिलेल्या तपशीलासह आता सूचनाची चौकशी होणार आहे.
सूचना सेठ (३९) ला ८ जानेवारी रोजी कर्नाटकातील चित्रदुर्गातून तिच्या मुलाच्या मृतदेहासह टॅक्सीत प्रवास करत असताना अटक करण्यात आली होती, कँडोलीमस्थित सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये सूचनाने मुलाची हत्या केली होती असे प्राथमिक तपासात दिसत आहे. शवविच्छेदनाच्या अहवालात सुद्धा मुलाची हत्या की जाड कापड किंवा उशीने तोंड दाबल्याने गुदमरून झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सूचनाने आपण मुलाची हत्या केलीच नाही उलट आपल्याला जेव्हा हॉटेलच्या खोलीत जाग आली तेव्हा अगोदरच मुलाचा मृत्यू झाला होता असे सांगितले आहे. पोलिसांसमोर सूचना व व्यंकट रमण यांची भेट झाली असता तेव्हा सुद्धा सूचनाने हत्येचे कारण पतीच असल्याचे म्हटले होते. आपल्या अवस्थेसाठी सुद्धा नवऱ्याला दोष देत सूचनाने त्याला पोलिसांसमोर धमकावले होते.
सूचनाने मुलाच्या हत्येच्या प्रकरणात कोणत्या गोष्टींची कबुली दिली?
दरम्यान, सूचनाला म्हापसा शहरातील न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. एनडीटीव्हीने एका वरिष्ठ अधिकार्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सूचना चौकशीदरम्यान कोणतेही सहकार्य करत नाहीये. तिने अनेक गोष्टींची सुरुवातीलाच कबुली दिली आहे. आपण मुलाचे प्रेत पिशवीत भरले, त्यासह टॅक्सीमधून प्रवास करत होतो हे तिने मान्य केले आहे. इतकेच नाही तर तिने ज्या हत्याराने आपले स्वतःचे मनगट कापले ते सुद्धा दाखवले आहे. पण तिने आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. उलट मुलाच्या हत्येसाठी तिने नवराच जबाबदार असल्याचा दावा वारंवार केला आहे. ती सर्व प्रश्नांची उत्तरे अर्धवट व तुटक देत आहे.
पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की तिची डीएनए चाचणी करून काही नमुने गोळा करणे आवश्यक आहे. हा प्रक्रियेचा एक भाग आहे. अद्याप हत्येमागील हेतू शोधणे बाकी आहे सेठचा पती व्यंकट रमण याच्या जबाबाचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले आहे. आयओला या स्टेटमेंटसह तिच्या जबाबाची उलट तपासणी करायची आहे, ज्यासाठी कोठडी वाढवणे आवश्यक होते.”