Elon Musk on Suchir Balaji Death: ‘चॅटजीपीटी’ची निर्मिती करणाऱ्या ‘ओपनएआय’ (OpenAI) या कंपनीचा माजी कर्मचारी आणि भारतीय-अमेरिकन संशोधक सुचिर बालाजीचा २६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को येथील घरात मृतदेह आढळून आला होता. सुचिरने ओपनएआय कंपनीच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे टीका केली होती. आत्महत्येमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्याच्या आईने ही हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्ला कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क यांनीही या प्रकरणात मोठे विधान केले आहे.
सुचिर बालाजीची आई पौर्णिमा रामाराव यांनी सुचिरच्या मृत्यूबाबात शंका व्यक्त केली होती. मात्र सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी प्राथमिक तपासात मृत्यूमागे कोणतेही गूढ कारण नसल्याचे सांगून त्यांचा दावा फेटाळून लावला. सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयानेही सदर मृत्यू आत्महत्या असल्याचे सांगितले. मात्र पौर्णिमा रामाराव यांनी आता एफबीआय चौकशीची मागणी केली आहे.
पौर्णिमा यांनी नुकतीच एक्सवर प्रतिक्रिया दिली असून त्यात म्हटले की, सुचिरच्या घरात तोडफोड आणि बाथरुममध्ये झटापटीच्या खुणा दिसत आहेत. बाथरुममध्ये रक्ताचे डाग दिसून येत असून तिथे त्याला मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसते. मात्र पोलिसांनी त्याच्या मृत्यूला आत्महत्या दाखवून आमच्यावर अन्याय केला आहे. सॅन फ्रान्सिस्को शहरातील पोलीस आम्हाला न्याय मिळण्यापासून रोखू शकत नाही, मी या प्रकरणाची एफबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी करते.
एलॉन मस्क यांचे उत्तर
पौर्णिमा यांनी केलेल्या एक्स पोस्टला एलॉन मस्क यांनी उत्तर दिले आहे. ही “आत्महत्या वाटत नाही”, अशी कमेंट मस्क यांनी केल्यामुळे आता या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. यानंतर आता सुचिर बालाजीच्या आईने मस्क यांच्याशी संपर्क साधून सदर प्रकरणात मदत करण्याची विनंती केली आहे.
सुचिर बालाजी कोण होता?
२५ वर्षीय सुचिर बालाजीचे बालपण क्यूपर्टिनो, कॅलिफोर्नियामध्ये गेले. कॅलिफोर्निया विद्यापीठात कम्प्युटर सायन्सचा अभ्यास करत असताना त्याने २०१८ साली त्याने एआय संशोधन प्रयोगशाळेत इंटर्नशिपसाठी प्रवेश मिळविला. त्यानंतर काही वर्षांनी त्याने ओपनएआयमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याठिकाणी त्याला वेबजीपीटीवर काम करण्याचा प्रकल्प मिळाला होता.