Sudan Conflict : निमलष्करी (आरएसएफ) आणि लष्करी दलांमध्ये झालेल्या संघर्षात सुदानमध्ये तब्बल १८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १८०० लोक जखमी आहेत, अशी माहिती युनायटेड नेशनचे सुदानमधील परराष्ट्रमंत्री वोल्कर पेर्थस यांनी माहिती दिली. द न्यू यॉर्क टाइम्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे. लष्करी दल आणि निमलष्करी दल यांचं विलिनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून सुदानमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
या युद्धामुळे पन्नास लाख लोकांनी सुदानची राजधानी खार्तुम सोडले आहे. तर, अनेक परदेशी नागरिक वीज आणि पाण्याविना घरात अडकून पडले आहेत. या युद्धामुळे वैद्यकीय सेवाही विस्कळीत झाली आहे. तर १२ हून अधिक रुग्णालयाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे जखमी नागरिकांचाही जीव धोक्यात आहे.
भारतीय दुतावासाकडून आवाहन
दरम्यान, सुदानमधील संघर्ष कमी होत नसल्याने तेथील भारतीयांनी खबरदारी घेण्याचे आवाहन भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे. सुदानमध्ये चार हजार भारतीय आहेत. त्यापैकी १२०० भारतीय अनेक वर्षांपासून तेथे स्थायिक आहेत. तर, रविवारी झालेल्या गोळीबारात अल्बर्ट या केरळी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. अल्बर्ट यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी केंद्र सरकारने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1800-11-8797 (टोल फ्री), +91-11-23012113, +91-11-23014104, +91-11-23017905, मोबाइल +91-9968291988 आणि ईमेल situationroom@mea.gov.in या क्रमांक आणि इमेलचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संघर्ष कशामुळे?
सुदानचे सैन्यप्रमुख जनरल अब्देल-फताह बुऱ्हान आणि आरएसएफचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दागालो हे दोघेही पूर्वाश्रमीचे सहकारी आहेत. सुदानमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांनी एकत्रितपणे लष्करी बंडाद्वारे तेथील अल्पकालीन लोकशाही उलथवून सत्ता ताब्यात घेतली होती. मात्र, आरएसएफच्या सैन्यामध्ये विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू झाला आहे. आपण वाटाघाटी करायला तयार नाही असे दोघांनीही स्पष्ट केले आहे. त्याऐवजी ते एकमेकांना शरण येण्याची मागणी करत आहेत.