Deaths Due To Corona Vaccine : करोना काळानंतर तरुणांच्या अचनाक होणाऱ्या मृत्युंची संख्या वाढली आहे. या प्रकारानंतर करोना लशीमुळे तरुणांचे अचानक होणारे मृत्यू वाढल्याची सर्वत्र चर्चा होती. तसेच करोना लशीच्या दुष्परिणामांबाबतही अनेक उलट सुलट चर्चा होत असते. अशात केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी नुकतेच राज्यसभेत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी देशात होणाऱ्या तरुणांच्या अचानक मृत्यूंमागे करोना लस नसल्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यसभेत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले की, “आयसीएमआरच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की करोना लशीमुळे अचानक होणाऱ्या मृत्यूची शक्यता कमी होते. ICMR च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीने १८ ते ४५ वयोगटातील लोकांवर एक अभ्यास केला. यामध्ये अशा लोकांचा समावेश करण्यात आला ज्यांचा १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान मृत्यू झाला होता.”

या संशोधनासाठी देशातील १९ राज्यांतील ४७ रुग्णालयांमधून नमुने घेण्यात आले होते. यातील २९१६ नमुने हृदयविकाराच्या झटक्यानंतर वाचलेल्या लोकांचे होते. तर ७२९ नमुने अचानक मृत्यू झालेल्यांचे होते. या संशोधनानंतर असे सांगण्यात आले की, करोना लशीचा किमान एक किंवा दोन डोस घेतल्यानंतर अचानक मृत्यूची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.

हे ही वाचा : “मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधाची अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

काय आहेत अचानक होणाऱ्या मृत्यूंमागिल कारणे?

करोनामुळे रुग्णालयात दाखल झालेले लोक.
कुटुंबातील कोणाचा तरी अचानक मृत्यू.
मृत्यूच्या ४८ तास आधी जास्त प्रमाणात मद्यपान करणे.
मृत्यूपूर्वी ४८ तासांच्या आधी जीममधी व्यायामासारखी अति शारीरिक क्रिया करणे.

हे ही वाचा : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित

एस्ट्राझेनकाने मान्य केले होते दुष्परिणाम

करोना लस बणवणारी आघाडीची ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी एस्ट्राझेनकाने त्यांनी निर्माण केलेल्या करोना लशीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात असे कबूल केले होते. भारतात एस्ट्राझेनकाची ही लस ‘कोविशील्ड’ म्हणून वापरण्यात आली आहे. या लशीमुळे रक्त गोठणे हा एक गंभीर दुष्परिणाम आहे. कंपनीने असेही म्हटले होते की, असले प्रकार केवळ दुर्मिळ प्रकरणांमध्येच होतात.

एस्ट्राझेनकाच्या या कबुलीनंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर सर्वोच्य न्यायालयाने कोरोना लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. तत्कालीन सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या याचिका केवळ खळबळ माजवण्यासाठी दाखल केल्याचे म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudden deaths india not due to covid vaccine union health minister jp nadda aam