Sudha Murthy in Kapil Sharma Show: सुधा मूर्ती या नावाला आता वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता खचितच राहिली असेल. इन्फोसिसचा महाप्रचंड डोलारा उभा करणारे नारायण मूर्ती यांना या कामात बरोबरीची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती या स्वत: एक उत्कृष्ट लेखिका, उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुधा मूर्तींच्या कामाचे आणि त्यांच्या लेखनाचे चाहते आहेत. पण सुधा मूर्तींना हे सगळं असूनही लंडनच्या हिथ्रो विमानतळावर चेष्टेचा सामना करावा लागला होता. पण त्यावर त्यांनी तिथल्या तिथे संबंधितांना आरसा दाखवला होता! त्यांनी स्वत:च ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हा किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्यात सुधा मूर्ती ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी शोच्या परीक्षक अर्चना पूरण सिंग यांनी सुधा मूर्तींना लंडनच्या हिथ्रो विमानतळावर घडलेल्या त्या प्रसंगाविषयी विचारणा केली. तेव्हा बोलताना सुधा मूर्तींनी क्लास हा पैशांवर अवलंबून नसतो, तर तुमच्या कामावरच्या श्रद्धेवर अवलंबून असतो, असं म्हणताच उपस्थित सर्वांनीच त्यावर मनापासून दाद दिली!

काय घडलं होतं लंडनच्या विमानतळावर?

हिथ्रो विमानतळावरचा किस्सा सांगताना सुधा मूर्ती म्हणाल्या, “४-५ वर्षांपूर्वीची ही घटना आहे. मी सलवार-कमीज घातली होती. माझ्याकडे बिझनेस क्लासचं तिकीट होतं. मी बिझनेस क्लासच्याच रांगेत उभी होते. त्यांना वाटलं साडी किंवा सलवार कमीज आहे म्हटल्यावर बहेनजी असेल. त्या मला म्हणाल्या ‘बहेनजी, ही तुमची रांग नाही, तुमची रांग तिकडे इकोनॉमी आहे’. मला वाटलं थोडी मस्करी करून घेऊ. मी म्हटलं नाही मी इथेच थांबते”, असं म्हणत सुधा मूर्तींनी त्या दोन सहप्रवासी महिलांचं संभाषण सांगितलं.

“त्या मला सांगायला लागल्या बिझनेस क्लासचं तिकीट किती महाग असतं तुम्हाला माहिती आहे का? त्या दोघी बोलत होत्या. त्या आधी हिंदीत बोलत होत्या. नंतर इंग्रजीत बोलायला लागल्या. त्या म्हणत होत्या कॅटल क्लास लोक आहेत. त्यांना काय माहिती इकोनॉमी क्लासबद्दल. आता एअर होस्टेस येईल आणि नंतर यांना रांग बदलावी लागेल. नंतर एअर होस्टेस आली आणि तिने मला आत सोडलं. मी आत गेल्यावर त्या दोघींना विचारलं कॅटल क्लास म्हणजे काय असतं?” असं सुधा मूर्तींना सांगितल्यावर त्याला कार्यक्रमातील प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली.

“ज्यांच्याकडे पैसा आहे ते क्लास लोक आहेत असं काही नसतं. देशाला सन्मान मिळवून देणारे महान गणिती मंजूल भार्गव क्लास आहेत. मदर तेरेसा क्लास आहेत. क्लास म्हणजे आपल्या कामावर श्रद्धा ठेवून चांगलं काम करणारे क्लास लोक असतात. पैशांमध्ये क्लास नसतो”, असंही सुधा मूर्ती यावेळी म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudha murthy in kapil sharma show cattle class london airport pmw