Sudha Murthy Speech in Rajyasabha : प्रसिद्ध लेखिका आणि खासदार सुधा मूर्ती यांनी पहिल्यांदाच २ जुलै रोजी राज्यसभेत भाषण केलं आहे. आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी महिलासंबंधित समस्या आणि पर्यटनाबाबत त्यांचं मत सभागृहासमोर मांडलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर त्या बोलत होत्या. तसंच, मी शिक्षिका असून केवळ पाच मिनिटे बोलणं माझ्यासाठी पुरेसे नाहीत, पुढच्या वेळी मला वेळ वाढवून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या पहिल्याच भाषणातील त्यांच्या दोन्ही मागण्यांमुळे सोशल मीडियावर त्यांची प्रचंड चर्चा चालू आहे.

सुधा मूर्ती यांनी सुरुवातील महिलांच्या आरोग्यसंबंधी विषय मांडला. गेल्या काही वर्षात महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे महिलांच्या मृत्यूदरातही वाढ झाली आहे. महिलांना या गर्भशयाच्या कर्करोगापासून प्रतिबंधित करायचं असेल तर पाश्चात्य देशात एक लस तयार झाली आहे. या लसीबाबत सुधा मूर्ती यांनी सभागृहाला माहिती दिली. “एक लसीकरण आहे जे नऊ ते १४ वयोगटातील मुलींना दिले जाते, ज्याला गर्भाशय ग्रीवाचे लसीकरण म्हणून ओळखले जाते . जर मुलींनी ते घेतले तर गर्भाशयाचा कर्करोग टाळता येऊ शकतो. आपण आपल्या फायद्यासाठी लसीकरणास प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे”, असे इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती यांनी सभागृहात सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या की, “आई मरण पावते तेव्हा रुग्णालयासाठी तो एक केवळ मृत्यू असतो. पण कुटुंबासाठी आई कायमची गमावली जाते.”

“सरकारने कोविड दरम्यान एक मोठी लसीकरण मोहीम हाताळली आहे. त्यामुळे ९ ते १४ वयोगटातील मुलींना गर्भाशय ग्रीवाचे लसीकरण करणे फार कठीण नाही”, असेही सुधा मूर्ती यांनी सांगितले. “गर्भाशय ग्रीवाचे लसीकरण पाश्चिमात्य देशांमध्ये विकसित केले गेले आहे आणि ते गेल्या २० वर्षांपासून वापरले जात आहे”, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> जे बोललो ते सत्यच! भाषणातील काही टिप्पण्या इतिवृत्तातून काढून टाकल्याने राहुल गांधी यांची नाराजी

“हे लसीकरण फार महाग नाही. आज माझ्यासारख्या क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी ते १४०० रुपये आहे. जर सरकारने हस्तक्षेप केला आणि वाटाघाटी केली तर ही लस ७००-८०० वर येऊ शकते. परंतु, भविष्यात याचा मुलींना नक्कीच चांगला फायदा होईल”, असंही त्यांनी अधोरेखित केलं. सुधा मूर्तींनी मांडलेली मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन राज्यसभेच्या तालिका अध्यक्षांनी दिलं.

भारतातील जागतिक वारसा स्थळ वाढवण्याची मागणी

तसंच, त्यांनी देशांतर्गत पर्यटनावरही सुधा मूर्ती यांनी त्यांचं मत मांडलं. त्या म्हणाल्या, “भारतात ५७ देशांतर्गत पर्यटन स्थळे आहेत, ज्यांचा जागतिक वारसा स्थळ म्हणून विचार केला पाहिजे. यामध्ये कर्नाटकातील श्रवणबेला गोला येथील बाहुबली मूर्ती, लिंगराजाचे मंदिर, त्रिपुरातील उनाकोटी खडकावरील कोरीव काम, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, मितावली येथील चौसठ योगिनी मंदिर, गुजरातमधील लोथल, गोल गुंबड इत्यादींचा समावेश आहे.”

“भारतात ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत. परंतु ५७ स्थळांनाही हा दर्जा दिला जाऊ शकतो. आपण त्या ५७ स्थळांची काळजी घेतली पाहिजे”, असं मूर्ती म्हणाले. त्या पुढे म्हणाल्या, “श्रीरंगममधील मंदिरे अप्रतिम आहेत. २५०० वर्षे जुने असलेले सारनाथच्या जुन्या स्मारकांचा समूह अजूनही जागतिक वारसा स्थळांमध्ये नाहीत. मध्य प्रदेशातील मितावली येथील हजारो वर्षे जुन्या चौसठ योगिनी मंदिरातून जुन्या संसद भवनाच्या डिझाइनचे प्रोटोटाइपिंग करण्यात आले आहे.”