इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती हे उद्योदक जोडपे त्यांच्या भूमिकांमुळे, वक्तव्यांमुळे किंवा साध्या राहणीमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० तास काम करायला हवं असं विधान केलं होतं. त्यावरूनही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गुरुवारी मूर्ती दाम्पत्याची सीएनबीसी १८ वाहिनीनं मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये विविध मुद्द्यांवर नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांनी भाष्य केलं. यावेळी सुधा मूर्ती यांनी त्यांच्या लग्नाच्या वेळी घडलेला एक किस्सा सांगितला.
मूर्ती की मूर्थी?
यावेळी मुलाखतीदरम्यान मूर्ती दाम्पत्याला नाव वेगवेगळ्या प्रकारे लिहिण्याबाबत विचारणा केली असता त्यावर दोघांनीही उत्तर दिलं. नारायण मूर्ती त्यांच्या नावाचं स्पेलिंग Murthy असं लिहितात तर सुधा मूर्ती त्यांच्या नावाचं स्पेलिंग Murty असं लिहितात. यासंदर्भात दोघांनीही आपापली भूमिका मांडली.
सुधा मूर्ती म्हणतात, लग्नावेळी मी अटच ठेवली होती!
यासंदर्भात बोलताना सुधा मूर्ती म्हणाल्या, “संस्कृत ही एक परिपूर्ण भाषा आहे. तिथे प्रत्येक उच्चारासाठी एक अक्षर आहे. जेव्हा माझ्या नावात thy लागतं, तेव्हा त्याचा उच्चार थ होतो. मूर्तीचा अर्थ प्रतिकृती होतो. त्यामुळे त्याचा उच्चार मूर्थी होऊ शकत नाही. त्यामुळे आमच्या लग्नावेळी मी घातलेल्या अटींपैकी ही एक अट होती की मी माझं नाव मूर्थी लिहिणार नाही. कारण ते मूळ संस्कृत शब्दाच्या विरुद्ध झालं असतं”, असं सुधा मूर्ती यावेळी म्हणाल्या.
नारायण मूर्ती स्वतः किती तास काम करायचे? ‘आठवड्याला ७० तास काम’ वादानंतर मूर्तींचा खुलासा
दरम्यान, यावर बोलताना नारायण मूर्ती यांनीही मनमोकळेपणाने उत्तर दिलं. “आमची मुलंही मुर्तीच लिहितात”, असं ते म्हणाले. “मला कधीच त्यावर आक्षेप नव्हता. मी खुल्या मनाचा आहे. माझ्या मते आमची मनं जुळणं महत्त्वाचं होतं. एकमेकांची मतं विरुद्ध असू शकतात, यावर आमची सहमती झाली होती. एकमेकांना स्पेस देणं आवश्यक होतं. जेणेकरून आम्ही दोघं मोकळेपणाने आपलं आयुष्य जगू शकू. महात्मा गांधी म्हणायचे की तुम्ही तुमच्या वर्तनातून एक उदाहरण घालून द्यायला हवं. मी आयुष्यभर असाच प्रयत्न केला. त्यामुळेच thy नाव लिहिण्यावर आग्रह करणं योग्य होणार नाही असा विचार मी केला”, असं नारायण मूर्ती यांनी सांगितलं.