Sudha Murthy On Narayan Murthy Statement: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी पहिल्यांदाच त्यांच्या पतीच्या आठवड्यातून ७० तास काम करण्याच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी याबाबत केलेल्या विधानानंतर याबाबत देशभरात मोठी चर्चा झाली होती. याचबरोबर त्यांना टीकेचा सामनाही करावा लागला होता. नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांनी आता पहिल्यांदाच यावर आपले मत व्यक्त केले आहे.

…तेव्हा वेळाचा विचार करत नाहीत

“जेव्हा लोक गंभीरपणे आणि उत्कटतेने काहीतरी करू इच्छितात तेव्हा ते वेळेचा विचार करत नाहीत. माझ्या पतीने जवळ पैसे नसतानाही इन्फोसिस कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांच्यापाशी खूप मेहनती आणि समर्पित सहकारी होते. यामध्ये ते यशस्वी होऊ शकले कारण ते दिवसाचे ७० तास किंवा कदाचित त्याहूनही जास्त काम करायचे. जर त्यांनी इतके तास काम केले नसते तर इन्फोसिस आज इतकी मोठी कंपनी बनली नसती, असे सुधा मूर्ती म्हणाल्या. त्या एनडीटीव्हीच्या ‘इंडिया थ्रू द आयज ऑफ इट्स आयकॉन्स’ या विशेष कार्यक्रमात बोलत होत्या.

कठोर परिश्रम, थोडेसे नशीब आणि…

सुधा मूर्ती पुढे म्हणाल्या की, “कठोर परिश्रम, थोडेसे नशीब आणि योग्य वेळी योग्य काम केल्यामुळेच हे शक्य झाले.” यावेळी त्यांनी असेही सांगितले की, केवळ त्यांचे पतीच नाही तर इतर व्यवसायातील अनेक लोक देखील खूप जास्त वेळ काम करतात, जसे की पत्रकार आणि डॉक्टर.

देवाने प्रत्येकाला २४ तास दिले आहेत

यावेळी सुधा मूर्ती यांनी असेही सांगितले की, त्यांचे पती इन्फोसिसमध्ये कामात व्यस्त असताना त्यांनी घर आणि मुलांची संगोपन करण्याचे ठरवले. त्यावेळी, त्यांनी एका महाविद्यालयात संगणक विज्ञान शिकवण्यास सुरुवात केली. सुधा मूर्ती म्हणाल्या की, “गरीब असो वा श्रीमंत, सुंदर असो वा कुरूप, देवाने प्रत्येकाला २४ तास दिले आहेत आणि ते कसे वापरायचे हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.”

नारायण मूर्ती यांचे ७० तास कामाचे विधान

नारायण मूर्ती यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये एका पॉडकास्टमध्ये आठवड्यातून ७० तास काम करण्याबद्दल विधान केले होते. भारतातील लोकांची कार्यक्षम उत्पादकता जगातील सर्वात कमी आहे असे सांगून त्यांनी एक नवीन वाद सुरू केला होता. दुसऱ्या महायुद्धातील जर्मनी आणि जपानचे उदाहरण देत त्यांनी म्हटले होते की, भारतातील तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करण्याचा विचार करावा.

Story img Loader