दिल्लीमधील सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सतारवादक अनुष्का शंकर यांनी महिलांवरील अत्याचाराविरोधात ऑनलाईन मोहिमेच्या माध्यमातून आवाज उठविण्याचे ठरविले आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ला change.org या वेबसाईटच्या माध्यमातून अनुष्का शंकर यांनी एक अब्ज महिलांना अत्याचाराविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवा आणि आपल्या मागण्या मांडा, असे आवाहन त्यांनी महिलांना आणि आपल्या चाहत्यांना केले. आता बस्स झाले, अत्याचार थांबलाच पाहिजे, हे घोषवाक्य घेऊन साईटच्या माध्यमातून महिलांना संघटित केले जाणार आहे. याच साईटवर अनुष्का शंकर यांचा एक व्हिडिओदेखील आहे. त्यामध्ये त्यांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करतानाच स्वतःच्या शोषणाच्या कटू आठवणी सांगितल्या आहेत.
वडिलांचा अतिशय विश्वास असलेली एक व्यक्ती लहानपणी माझे शारीरिक आणि मानसिक शोषण करीत होता. जसजसे वय वाढू लागले, तसतसे इतर महिलांना येतात, तसे अनुभव मलाही येऊ लागले. स्पर्शाच्या, शब्दांच्या माध्यमातून शोषणाचा त्रास मीदेखील सहन केला. त्यावेळी या सगळ्याचा कसा मुकाबला करायचा, हे कळत नव्हते. हे चित्र कधी बदलता येईल का, हे सुद्धा समजत नव्हते. एक महिला म्हणून मी कायम भितीच्या वातावरणात राहात होते. रात्रीच्यावेळी घराबाहेर पडायलाही घाबरत होते. एखाद्या परपुरुषाने भेटीसाठी वेळ मागितला, तर काय करावे, हेच सुचत नव्हते, अशी आठवत त्यांनी सांगितली. त्याचवेळी आता बस्स झाले. यापुढे महिलांवरील अत्याचाराविरोधात उभं राहण्याचे ठरविले असल्याचे तिने म्हटले आहे.

Story img Loader