पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना लाहोरमधील त्यांच्या निवासस्थानीच लक्ष्य करण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला असून या प्रकरणी चार आत्मघातकी हल्लेखोरांसह एकूण आठ जणांना अटक केली आहे.
शरीफ यांना लाहोर शहराजवळील रायविंद येथील त्यांच्या फार्महाऊसवरच लक्ष्य करण्याचा कट पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने उधळून लावला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान गिलानी यांचा पुत्र अली हैदर याचे मे महिन्यांत झालेल्या निवडणुकीच्या वेळी अपहरण करण्यात आले. त्याचा तपास गुप्तचर यंत्रणा करीत आहेत.
उत्तर वझिरिस्तानस्थित दहशतवादी गट लाहोरमध्ये सक्रिय झाला असून त्यांनी शरीफ यांच्यावर आत्मघातकी हल्लेखोरांमार्फत हल्ला करण्याचा कट रचला होता, असे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. लाहोरपासून ४०० कि.मी. अंतरावर असलेल्या मुलतान येथे हैदर याला शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी छापा टाकला होता. तेव्हा तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दोघा संशयितांना अटक करण्यात आली. मतिऊर रेहमान आणि मोहम्मद यासिन हे या गटाचे नेते आहेत.
सदर संशयितांची चौकशी केली असता त्यांनी शरीफ यांना त्यांच्याच फार्म हाऊसवर लक्ष्य करण्याचा कट रचण्यात आल्याचे सांगितले. या नियोजित कटासाठी फहीम मिओ या रायविंद येथील रहिवाशाची प्रामुख्याने मदत घेण्यात आली असल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले.
रायविंद येथे जवळपास आठवडाभर तळ ठोकून पथकाने मिओला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून उस्मान ऊर्फ सैफुल्ला मेहमूद इक्बाल याला अटक करण्यात आली. शरीफ यांच्या फार्म हाऊसनजीकच उस्मान याच्या मालकीची जमीन असून त्याचे बन्नू आणि उत्तर वझिरिस्तानातील तालिबान दहशतवाद्यांशी थेट संबंध आहेत.
बन्नू येथून लाहोरकडे निघालेल्या चार आत्मघातकी हल्लेखोरांना सुरक्षा यंत्रणांनी पकडले. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सूचनेवरून शरीफ आणि त्यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी रायविंद फार्म हाऊसवर येण्याचा आपला नेहमीचा मार्गही बदलला होता.
मतिऊर रेहमान आणि यासिन या तालिबान्यांच्या दोघा कमांडरचा माजी अध्यक्ष मुशर्रफ, माजी पंतप्रधान अझिझ, आयएसआयची हमजा येथील छावणी आणि लष्कराचे मुख्यालय यावर आत्मघातकी हल्ले चढविण्यात हात होता.