वायव्य पाकिस्तानात पेशावर शहरातील हमरस्त्यावर सोमवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात आठ जण ठार झाले. मृतांमध्ये अफगाण शांतता परिषदेच्या सदस्याच्या मुलाचा समावेश आहे.या गजबजलेल्या रस्त्यावरून सोमवारी सकाळी दुचाकीस्वार जात होता. या दुचाकीवर स्फोटके ठेवण्यात आली होती. विद्यापीठ रस्त्यावर पोलिसांच्या गाडीजवळ येताच दुचाकीस्वाराने हा स्फोट आत्मघातकी हमला केला. या वेळी पोलिसांची गाडी बसथांब्याजवळ होती. परिणामी पोलिसांच्या गाडीतील तसेच बसमधील अनेक जण यात जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
या हल्ल्यात आठ जण ठार तर अन्य ४५ जण जखमी झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी या सर्व भागाला वेढा घातला असून जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
अफगाण शांतता परिषदेचे सदस्य काझी अमीन वकाद यांचा पुत्र काझी हिलाल अहमद व हिज्ब-ए-इस्लामी (खालीस ग्रुप)चे नेते मौलवी युनूस खालीस यांचा पुतण्या मुहम्मद इद्रिस हे या हल्ल्यात मरण पावले. खैबर प्रशिक्षणार्थी रुग्णालयात या दोघांच्या नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली असल्याचे दूरचित्रवाणी वाहिनीने म्हटले आहे. अफगाणिस्तानात होणाऱ्या उलेमा परिषदेत येथील मौलवींना आमंत्रित करण्यासाठी अहमद येथे आला होता, असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Story img Loader