हैदराबादमध्ये एका खासगी संस्थेत काम करणाऱ्या 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संस्थेत वरिष्ठांकडून होणाऱ्या छळामुळे त्याने आत्महत्या करण्याचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी(दि.18) त्याने सैदाबाद परिसरातील त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नरसिंग असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये वरिष्ठांकडून छळ केला जात असल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्याने लिहिलंय. याशिवाय, पंतप्रधान मोदी हेच देशाचे कायम पंतप्रधान राहावेत…मोदीच देशाला वाचवू शकतात असंही त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नमुद केलंय अशी माहिती घटनेचा तपास करणारे पोलीस निरीक्षक एन. मोहन राव यांनी दिली आहे. ‘त्याला राजकारणाबद्दल आवड होती आणि राजकारणाबद्दल स्वतःचे मत तो नेहमी मांडायचा’ असंही राव यांनी सांगितलं.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.