दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर सुमारे ४५ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्लीच्या नायब राज्यपालांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. अशातच आता मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने यासंदर्भात मोठा दावा केला आहे.
हेही वाचा – “भारतीय मुलींच्या न्यायासाठी…”, कुस्तीगीरांची देशवासियांना कळकळीची विनंती
हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सुकेश चंद्रशेखरने दिल्लीच्या नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांना पत्र लिहित केजरीवाल यांच्या घरातील फर्निचर आणि इतर नूतनीकरणासाठी त्याने स्वत: पैसे दिले असल्याचा दावा केला आहे. तसेच हे फर्निचर अरविंद केजरीवाल आणि तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी स्वत: निवडले असल्याचंही त्याने म्हटलं आहे. याशिवाय १५ चांदीची ताट आणि २० ग्लास तसेच १२ जणांना जेवता येईल असा डायनिंग टेबल, ३४ लाख रुपये किंमतीचे बेडरूमधील ड्रेसिंग टेबल, भिंतीवरील घड्याळं इत्यादी सामान इटलीवरून खरेदी केल्याचंही सुकेश चंद्रशेखरने पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा – “मणिपूर जळतंय आणि पंतप्रधान मोदी घाण सिनेमाविषयी..” ‘द केरला स्टोरी’ वरून ओवैसीचा पलटवार
दरम्यान, याप्रकरणी काही दिवसांपूर्वी दिल्ली नायब राज्यपाल यांनी चौकशीचे निर्देश दिले होते. तसेच १५ दिवसांच्या आत यासंदर्भातील अहवाल सादर करण्यास सांगितलं होते. तर दिल्लीतील सार्वजनिक बांधकाम मंत्री आतिशी यांनी न्यायब राज्यपालांचे निर्देश असंवैधानिक असल्याचं म्हटलं होतं.