जयपूरमध्ये करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर त्यांच्या पत्नीने आता हा आरोप केला आहे की राजस्थानचे तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राज्य पोलीस प्रमुख यांना काहीवेळा पत्र लिहून सुरक्षा मागितली होती मात्र गोगामेडी यांना सुरक्षा पुरवली गेली नाही. गोगामेडी यांच्या जिवाला धोका आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ते सामाजिक काम करत आहेत त्यामुळे धमक्या आल्या आहेत असं पत्रात लिहिलं होतं तरीही याकडे डोळेझाक केली गेली असा आरोप गोगामेडी यांच्या पत्नी शीला शेखावत यांनी केला आहे.
सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येनंतर जयपूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. यानंतर जो FIR दाखल करण्यात आला त्यामध्ये शीला शेखावत यांनी असा दावा केला आहे की पंजाब पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात राजस्थानचे पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांना करणी सेनेचे अध्यक्ष गोगामेडी यांच्या हत्येच्या कटाबाबत पत्र लिहून माहिती दिली होती. तसंच याची माहिती जयपूर ‘अँटी टेरर स्क्वाड’लाही देण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आणि उमेश मिश्रा या दोघांनाही गोगामेडी यांच्या जिवाला धोका आहे याची कल्पना होती तरीही त्यांनी सुरक्षा पुरवली नाही.
शीला शेखावत यांनी हेदेखील म्हटलं आहे की त्यांच्या पतीच्या हत्येसंदर्भात आंतरराष्ट्रीय दहशतवादी रोहित गोदारा आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्याविषयीही वाचलं आहे. त्यांनी हादेखील आरोप केला आहे की आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांकडून गोगामेडी यांच्या जिवाला धोका होता. आपल्याला ही बाब आपल्या पतीने अनेकदा सांगितली होती. ज्यानंतर सुरक्षा प्रदान केली जाणं अपेक्षित होतं मात्र माजी मुख्यमंत्र्यांनी आणि पोलीस महासंचालकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप आता शीला शेखावत यांनी केला आहे.
त्येप्रकरणी जयपूरच्या श्यामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ३९७, ३४१, ३४३ आणि २५(६) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्टेशन हाऊस ऑफिसर मनीष गुप्ता याप्रकरणी तपास करणार आहेत. दरम्यान, एफआयआर दाखल करताना यामध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, सुखदेव सिंह गोगामेडी यांनी वर्षभरापूर्वी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगून प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली होती. गोगामेडी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पोलीस महासंचालकांकडेही सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती.
सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. या हत्येनंतर राजपूत संघटनांनी बुधवारी (६ डिसेंबर) राजस्थान बंदची हाक दिली. या बंदला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांनी बंद पाळला. दरम्यान, सुखदेव गोगामेडी यांची पत्नी शीला शेखावत-गोगामेडी यांनी घोषणा केली आहे की गुरुवारीदेखील राजस्थान बंद राहील. शीला शेखावत म्हणाल्या, मी संपूर्ण देशभरातल्या राजपुतांना आवाहन करते की, त्यांनी मोठ्या संख्येने इथं यावं. कारण आज सुखदेव सिंह यांची हत्या झाली आहे, उद्या आपल्यापैकी कोणावरही हल्ला होऊ शकतो.