सुकमा येथे नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बिहारच्या एका जवानाला दिलेला धनादेश बाऊन्स झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. हा धनादेश हुतात्मा जवान रंजीतकुमार यांच्या कुटुबीयांना बिहार सरकारने दिला होता. रंजीतकुमार यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रूपयांची मदत देण्यात आली होती. सुकमा हल्ल्याप्रकरणी यापूर्वीही बिहार सरकारवर टीका करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सुकमा येथील हल्ल्यात बिहारचे सहा जवान हुतात्मा झाले होते. परंतु, बिहार सरकारमधील एकही मंत्री जवानांच्या घरी गेले नव्हते.

रंजीतकुमार शेखपुरा येथील रहिवासी होता. रंजीतकुमार यांचे कुटुंबीय अनेक दिवसांपासून धनादेश वटवण्यासाठी फिरत होते. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, रंजीतकुमारच्या पत्नी सरितादेवींनी पाच लाख रूपयांचा तो धनादेश एचडीएफसी बँकेच्या शेखपुरा शाखेत जमा केला होता. परंतु, तो चेक वटण्याऐवजी जमुई, पाटणा आणि नोएडाच्या बँकेत फिरत राहिला.

रंजीतकुमार यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या धनादेशावरील स्वाक्षरीमध्ये चूक झाली होती, अशी माहिती शेखपुराचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार यांनी सांगितले. २४ एप्रिल रोजी छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गटावर हल्ला केला होता. या हल्ल्यात २५ जवान हुतात्मा तर सहा जण गंभीर जखमी झाले होते. सुमारे ३०० हून अधिक नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते. नंतर काही लोकांना पकडण्यातही आले होते. ग्रामस्थांच्या मदतीने नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जाते.

Story img Loader