मुस्लीम महिलांचे फोटो चोरून त्यांचा लिलाव करणाऱ्या मोबाईल अ‍ॅपच्या निर्मात्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे दिल्लीत खळबळ उडाली होती. हा प्रकार उघड झाल्यानंतर हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आता बंद करण्यात आलं आहे. मात्र, तरी देखील अशा प्रकारे महिलांची बदनामी झाल्यामुळे दिल्लीच्या महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला असून हे मोबाईल अ‍ॅप तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका काय आहे प्रकार?

Sulli Deals या नावाच्या एका मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमुळे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुस्लीम महिलांच्या सोशल नेटवर्किंग प्रोफाईलवरून त्यांचे फोटो चोरून त्यांचा वापर या अ‍ॅप्लिकेशनमध्ये केला जात होता. त्यांचे फोटो आक्षेपार्ह पद्धतीने वापरून त्यांचा लिलाव या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर केला जात होता. GitHub या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून हा फोटोंचा लिलाव केला जात होता. आत्तापर्यंत अशा शेकडो महिलांचे फोटो या अ‍ॅपवर लिलावासाठी अपलोड करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात काही नेटिझन्सनी याचे स्क्रीनशॉट पोस्ट केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

 

दिल्ली महिला आयोगाची नोटीस

हा प्रकार उघड झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली असून त्यांच्याकडून १२ जुलैपर्यंत उत्तर मागवण्यात आलं आहे. “दिल्ली महिला आयोगाने या प्रकाराची स्युमोटो दखल घेतली आहे. GitHub या प्लॅटफॉर्मचा वापर करून मुलींचे फोटो अ‍ॅपवर अपलोड केले गेले. ४ जुलै रोजी अशा प्रकारचे शेकडो फोटो Sulli Deals या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर अपलोड करण्यात आले”, असं दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

 

नॅशनल सायबरक्राईम रिपोर्टिंग पोर्टलने केलेल्या तक्रारीवर कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने Sulli Deals मोबाईल अॅप्लिकेशनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या अॅपसंदर्भात अधिक माहिती पुरवण्याबाबत GitHub ला नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची प्रत, संशयित आरोपीची माहिती, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची माहिती, आरोपीला अटक करण्यासाठी उचलण्यात आलेली पावलं या संदर्भात दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांकडून माहिती मागवली आहे.