सभागृहातील कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याच्या निर्णयाचे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सोमवारी जोरदार समर्थन केले. संसदेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे, पाहू या पुढे काय होते, असेही महाजन म्हणाल्या.
‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने आयोजित केलेल्या आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात कामकाज तहकुब झाल्यावर महाजन सहभागी झाल्या होत्या. देशाच्या संसदीय कार्यपद्धतीला सुसंस्कृत वारसा मिळेल, या अपेक्षेने आपण कठोर निर्णय घेतला आहे. सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध कठोर कारवाई करून नवी सुरुवात केली आहे, असे महाजन या वेळी म्हणाल्या. संसदेचे अस्तित्व का आहे, असा कधीतरी विचार केला पाहिजे, चर्चेसाठी संसद आहे, राजनैतिक मुत्सद्देगिरीसाठी संसद आहे की काही कायदे करण्यासाठी संसद आहे, याबाबत एक नियमावली आहे. संसदपटूंनीच ही नियमावली तयार केली आहे. संसदपटू म्हणून आपण जी नियमावली केली आहे तर त्याला विरोध करण्यासाठी कामकाजात व्यत्यय आणणे हाच मार्ग का चोखाळला जातो? याबाबत विचार करण्याची गरज आहे, की हे असेच सुरू ठेवायचे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गेल्या आठ दिवसांपासून आपण हा गोंधळ पाहत आहोत, गोंधळ घालू नका, तुमच्या काही मागण्या असल्यास त्यावर चर्चा करू या, अशी विनंतीही केली होती, असे महाजन म्हणाल्या.
गेल्या आठवडय़ात काँग्रेसचे सदस्य अधिररंजन चौधरी यांना सभागृहातून बाहेर जाण्याचा आपण आदेश दिला. त्या वेळी अभ्यागतांच्या गॅलरीत काही शालेय विद्यार्थी बसल्याचे आपण पाहिले आणि मनात प्रश्न आला की, आपण त्यांच्यापुढे काय मांडून ठेवत आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भाजप विरोधी पक्षात असताना त्यांनीही असेच वर्तन केले होते, याकडे लक्ष वेधले असता महाजन म्हणाल्या की, यापूर्वीही असेच प्रकार सुरू होते. त्यामुळे हे प्रकार कधीतरी थांबण्याची गरज आहे, असे आपल्याला वाटले. आपल्या आणि तुमच्या मुलांनी जे केले तेच आपल्या नातवंडांनी करावे का, असा सवालही त्यांनी केला. आपल्या निर्णयाचा फेरविचार करणार का, असे विचारले असता त्यांनी मौन पाळले. आज आपण निर्णय घेतला आहे, पुढे काय होते ते पाहू, आपण हट्टी नाही, असेही त्या म्हणाल्या.
‘गोंधळाचा अतिरेक’
सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठकही आपण घेतली आणि आपल्या पक्षाच्या सदस्यांना सभागृहात गोंधळ न घालण्याच्या सूचना केल्या. यामुळे गोंधळ थांबलाच नाही, उलटपक्षी काही सदस्य आपल्या दिशेने चालून येण्याचे प्रकार घडले. फलक तोंडासमोर आणण्याचे प्रकार सुरू झाले, तेव्हा हा कळस झाला असे वाटले. विरोधकांचे काही म्हणणे असते, परंतु सरकारकडेही काही मार्ग असतात, असेही महाजन म्हणाल्या.