पीटीआय, नवी दिल्ली
दिल्लीत १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत पुल बंगश येथे झालेल्या काही शीख नागरिकांच्या हत्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने ज्येष्ठ काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना ५ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे ‘समन्स’ बुधवारी बजावले. या प्रकरणाच्या आरोपपत्राची दखल घेत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी विधि गुप्ता आनंद यांनी हा आदेश दिला.
या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २० मे रोजी टायटलर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केल्यानंतर १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीतील पुल बंगश भागात झालेल्या हिंसाचारात तीन जणांची हत्या करण्यात आली आणि गुरुद्वाराला आग लावण्यात आली होती. न्यायालयात दाखल आरोपपत्रात ‘सीबीआय’ने म्हटले आहे, की टायटलर यांनी १ नोव्हेंबर १९८४ रोजी आझाद मार्केटमधील पुल बंगश गुरुद्वारामध्ये जमलेल्या जमावाला चिथावणी दिली. त्यामुळे गुरुद्वारा जाळण्यात आला आणि ठाकूर सिंग, बादल सिंग आणि गुरू चरण सिंग या तीन शीख नागरिकांची हत्या करण्यात आली. ‘सीबीआय’ने टायटलर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.