केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास अखेर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
सुनंदा यांच्या मृत्यू प्रकरणास अनेक कंगोरे असून हा मृत्यू अपघाती आहे, की ही हत्या याबाबत बरेच संभ्रम आहेत. त्यातच शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण ‘स्लो पॉयझनिंग’ अर्थात टप्प्याटप्प्याने वाढलेली विषबाधा असे नमूद करण्यात आले होते. शिवाय, त्यांच्या डाव्या दंडावर खोलवर दात रुतल्याच्या खुणाही आढळल्या होत्या आणि अंगावर सुमारे डझनभर जखमांचे व्रण आढळले होते.  
त्यामुळे, या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी ‘हत्ये’च्या दृष्टीनेही तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.
कुटुंबियांचा हात नसल्याचा निर्वाळा
या पाश्र्वभूमीवर, सदर तपास गुन्हे शाखेकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, चौकशी करणाऱ्या उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनंदा यांचा भाऊ, त्यांचा मुलगा आणि शशी थरूर यांची चौकशी केल्यानंतर सुनंदा मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचा हात नसल्याचा निर्वाळा दिला होता.
न्यायदंडाधिकाऱ्यांचे निरीक्षण
सुनंदा यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांच्या शरीरात अल्प्राझोलम आणि एक्स्रिडीन ही दोन विषारी द्रव्ये आढळली आहेत. यापैकी एक्स्रिडीन हे अ‍ॅसिटॅमिनोफेन, अ‍ॅस्पिरीन आणि कॅफिन या द्रव्यांचे मिश्रण मानले जाते. शवविच्छेदन अहवाल आणि करण्यात आलेल्या चौकशा यांच्या अंती ‘सुनंदा यांचा मृत्यू मनुष्यवध, आत्महत्या किंवा अपघाती’, असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी काढला असून, हत्येची शक्यता लक्षात घेत तपास करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, हे तपासकाम आथा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यामुळे या प्रकरणास वेगळे वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

Story img Loader