केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे गूढ शनिवारी आणखीनच गडद झाले. सुनंदा यांचा मृत्यू अनैसर्गिक आणि आकस्मिक असल्याचे सांगत सूत्रांनी त्यांचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनामुळेही झाला असल्याची शक्यता वर्तवली. मात्र, याबाबत ठोस माहिती देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. दरम्यान, सुनंदा यांच्या पार्थिवावर शनिवारी लोधी मार्ग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
येथील लीला पॅलेस हॉटेलात शुक्रवारी रात्री सुनंदा यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर शनिवारी पहाटे त्यांचा मृतदेह अखिल भारतीय आयुíवज्ञान संस्थेच्या (एआयआयएमएस) रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तेथील तीन डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. यावेळी सुनंदा यांच्या शरीरावर जखमा आढळल्या. त्यांचा व्हिसेरा घेण्यात आला असून सुनंदा यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
थरूर यांच्याशी वाद..
झोपेच्या गोळ्या
दरम्यान, गेल्याच आठवडय़ात सुनंदा तिरुवअनंतपुरम येथील केरळ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (केआयएमएस) उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. तेथील डॉक्टरांनी त्यांच्या संपूर्ण तपासण्या करून दिल्लीहून परतल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले होते. तिरुवअनंतपुरम येथून दिल्लीला येत असताना विमानातच थरूर यांच्याशी त्यांचा वाद झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर पाकिस्तानी महिला पत्रकार मेहेर तरार यांच्या ट्विट प्रकरणामुळे त्या आणखी बिथरल्या होत्या. लीला पॅलेस हॉटेलच्या लॉबीत थरूर आणि सुनंदा यांच्यात वादावादी झाल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर शुक्रवारी रात्री सुनंदा यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी झोपेच्या गोळ्या अतिप्रमाणात घेतल्या असाव्यात व त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे. सुनंदा यांच्या शरीरावर जखमा आढळल्या असल्या तरी औषधसेवनाचा परिणाम म्हणून शरीरावर असा परिणाम होऊ शकतो अशी सारवासारव करत वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याबाबत आणखी माहिती देण्यास नकार दिला. थरूर यांच्याशी तरार प्रकरणावरून झालेला वाद आणि झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन या दोन गोष्टी सुनंदा यांच्या मृत्यूचे कारण असू शकतात असाही संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सुनंदा यांच्या पार्थिवावर येथील लोधी मार्ग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र शिव मेनन यांनी सुनंदा यांच्यावर अग्निसंस्कार केले. शिव मेनन हे सुनंदा यांच्या अगोदरच्या विवाहातील पुत्र आहेत. संरक्षण मंत्री ए. के. अँटनी, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री वायलर रवी व शीला दीक्षित यांनी श्रद्धांजली वाहिली.
थरूर रुग्णालयात
सुनंदा यांच्या आकस्मिक निधनाने मानसिक धक्का बसलेले शशी थरूर यांना शनिवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
“सुनंदा यांचा मृत्यू अनैसर्गिक आणि आकस्मिक आहे. त्यांच्या शरीरावर जखमा आढळल्या परंतु आताच त्याबाबत अधिक काही बोलणे उचित ठरणार नाही. आम्ही सर्व प्रकारचे नमुने घेतले असून तपशीलवार अहवालानंतरत या प्रकरणाबाबत अंतिम निष्कर्ष काढता येईल.”
डॉ. सुधीर गुप्ता, एआयआयएमएसचे तज्ज्ञ