काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या व्हिसेऱ्याचे नमुने कोणत्या देशात पाठवायचे याबाबतचा निर्णय विशेष तपास पथक (एसआयटी) येत्या एक-दोन दिवसांत घेणार आहे, असे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले.
सुनंदा पुष्कर यांच्या व्हिसेऱ्याचे नमुने अमेरिका अथवा इंग्लंडमध्ये पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांना झालेली विषबाधा कोणत्या स्वरूपाची आणि किती प्रमाणात झाली ते तपासण्यात येणार आहे.
व्हिसेरा परदेशात पाठविण्यात येणार आहे आणि त्याबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांत घेण्यात येणार आहे. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक असून तो विषबाधेमुळे झाल्याचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी १ जानेवारी रोजी खुनाचा गुन्हा नोंदविला. विष कोणत्या स्वरूपाचे होते आणि किती प्रमाणात होते ते स्पष्ट करण्यात आलेले नाही.
शशी थरूर यांच्या चौकशीबाबत विचारले असता बस्सी म्हणाले की, विशेष तपास पथक निश्चित कृती योजनेद्वारे कृती करीत असून आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा