माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता, या भूमिकेवर ‘एम्स’चे डॉक्टर सुधीर गुप्ता अद्याप ठाम आहेत. शवविच्छेदनावेळी माझ्यावर दबाव नव्हता, हे ‘एम्स’ प्रशासनाला कसे माहिती आणि त्याबद्दल ते कसे काय बोलू शकतात, असा सवाल गुप्ता यांनी उपस्थित केला. या सर्व प्रकरणावर इतक्या तातडीने पत्रकार परिषद बोलावून खुलासा करण्याची काय गरज होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी डॉ. सुधीर गुप्ता यांच्यावर कोणताही दबाव नव्हता, असा खुलासा ‘एम्स’ प्रशासनातर्फे बुधवारी दुपारी केला होता. गुप्ता यांना त्याबद्दल प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी ‘एम्स’ प्रशासनावरच तोफ डागली. ते म्हणाले, मी केवळ सुनंदा पुष्कर यांचाच नव्हे, तर आत्तापर्यंत अनेक व्यक्तींचा शवविच्छेदन अहवाल तयार केला आहे. आत्तापर्यंत कोणीही टाकलेल्या दबावाला मी कधीच जुमानलेले नाही.
गुप्ता यांनी सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनलला (कॅट) पत्र लिहीले आहे. यामध्ये त्यांनी सुनंदा पुष्कर यांचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी बड्या अधिकाऱयांकडून आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव आणला गेला असल्याचे म्हटले आहे. गुप्ता यांच्या खळबळजनक पत्रामुळे सुनंदा पुष्कर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Story img Loader