‘एम्स’ रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी ‘सुनंदा पुष्कर यांच्या शवविच्छेदन अहवालात फेरफार करण्यासाठी  आपल्यावर दडपण आणण्यात आले होते’ या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे. तसेच एम्सच्या प्रवक्त्यांकडून बुधवारी करण्यात आलेला ‘दबाव नसल्याचा’ दावा फेटाळून लावला आहे.
‘जर माझ्यावर दडपण आणले गेले असेल तर ते इतर डॉक्टरांना कसे कळणार? माझ्यावर दडपण होते की नव्हते याविषयी स्पष्टीकरण देणारे ते कोण? त्यांना असे खुलासे करण्याचा हक्कच काय? इतक्या घाईघाईने पत्रकार परिषद घेण्यामागील प्रयोजन काय? मी आजही माझ्या दाव्यावर ठाम आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया डॉ. सुधीर गुप्ता यांनी व्यक्त केली.
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयित मृत्यूनंतर त्यांचा शवविच्छेदन अहवाल तयार करतेवेळी त्यात फेरफार करण्यासाठी व सदर मृत्यू नैसर्गिक असल्याचा निर्वाळा देण्यासाठी आपल्यावर दडपण आणले जात होते, असा आरोप डॉ. सुधीर गुप्ता यांनी बुधवारी केला होता. त्यानंतर काही तासांतच एम्स रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप निराधार असल्याचा खुलासा केला होता.
या विषयी डॉ. गुप्ता यांना प्रश्न विचारला असता, मी केवळ सुनंदा यांचेच नव्हे तर अनेकांचे शवविच्छेदन केले आहे आणि प्रत्येक वेळी त्याचा अहवाल हा वैद्यकीय क्षेत्रातील उच्च मूल्य आणि तत्त्व यांची जपणूक करीतच तयार केले असे त्यांनी सांगितले. आजवर एकदाही आपण अशा दबावास बळी पडलो नाही, असा दावाही डॉ. गुप्ता यांनी केला.

Story img Loader