सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणात दिल्ली हायकोर्टाने पत्रकार अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीला नोटीस बजावली आहे. सुनंदा पुष्कर प्रकरणात खासदाराच्या शांत राहण्याच्या अधिकाराचा सन्मान करा असेही हायकोर्टाने गोस्वामींना सुनावले आहे.
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणात रिपब्लिक वृत्तवाहिनीवर सुरु असलेल्या वृत्तांकनावरुन शशी थरुर यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुनंदा पुष्कर प्रकरणात चुकीच्या वृत्तांकनावर बंदी टाकण्याची मागणी शशी थरुर यांनी केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने पुष्कर मृत्यूप्रकरणातील वृत्तांकनावर निर्बंध घातलेले नाही. मात्र न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक वृत्तवाहिनीला नोटीस बजावली. २९ मेरोजी झालेल्या सुनावणीत त्यांच्या वकिलांनी बदनामीकारक आणि प्रतिमा मलिन करणारे वृत्त देणार नाही असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही बदनामीकारक वृत्त दाखवणे सुरुच आहे याकडे थरुर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. यावर हायकोर्टाने गोस्वामी आणि वृत्तवाहिनीला खडे बोल सुनावले. आम्ही रिपब्लिकला वृत्तांकन करण्यापासून रोखू शकत नाही. पण ते वारंवार शशी थरुर यांचे नाव घेऊ शकत नाही. थरुर यांच्या शांत राहण्याच्या अधिकाराचा तुम्हाला सन्मान करावा लागेल असे हायकोर्टाने सांगितले.
थरुर यांच्यावतीने सलमान खुर्शीद यांनी हायकोर्टासमोर बाजू मांडली. ‘गोस्वामी आणि वृत्तवाहिनीला सुनंदा पुष्कर यांची हत्याऐवजी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू हा शब्दप्रयोग करावा’असे निर्देश द्यावेत’ अशी मागणी खुर्शीद यांनी केली. याप्रकरणाची पुढील सुनावणी १६ ऑगस्टरोजी होणार आहे.