सुनंदा पुष्कर यांचे मृत्यूपूर्वी जिच्यावरून पती शशी थरूर यांच्याशी भांडण झाले होते, त्या पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
मेहर तरार या प्रकरणावर प्रकाश टाकू शकणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. त्यामुळे गरज पडल्यास त्यांच्याशी बोलण्याचे आम्ही प्रयत्न करू, असे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
तरार यांना तपासात सहभागी होण्यासाठी ‘अधिकृत मार्गाने’ औपचारिक विनंती केली जाईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या मुद्दय़ावर कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास आपण तयार असल्याचे तरार यांनी दोन महिन्यांपूर्वी म्हटले होते.
शशी थरूर यांच्याशी असलेल्या कथित प्रेमप्रकरणाच्या मुद्दय़ावर सुनंदा पुष्कर यांचे ट्विटरवर तरार यांच्याशी भांडण झाले होते. ५२ वर्षांच्या सुनंदा पुष्कर त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे गेल्यावर्षी १७ जानेवारीच्या मध्यरात्री दक्षिण दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमधील त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या होत्या. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, थरूर यांचीही गेल्या महिन्यात चौकशी केली आहे.

Story img Loader