माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणास बुधवारी कलाटणी मिळाली. सुनंदा पुष्कर यांचा शवविच्छेदन अहवाल तयार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी आपल्याला न्यायवैद्यक अहवालात फेरफार करण्यास भाग पाडले गेले असल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली. अखेर केंद्र सरकारनेही या प्रकरणी तपशीलवार अहवाल सादर करावा असे आदेश ‘एम्स’ रुग्णालयास दिले आहेत. ‘एम्स’ रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी आरोग्य विभागाला पत्र लिहून आपल्या बढतीविषयी केंद्राला विनंती केली होती. मात्र मंगळवारी रात्री दूरचित्रवाहिन्यांनी या पत्रात काही विशिष्ट आरोप करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले, त्यामुळे या प्रकरणी ‘एम्स’कडून तपशीलवार अहवाल मागविण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. डॉ. सुधीर गुप्ता हे एम्स रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी केलेल्या विधानांमुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विधानांबाबत गुप्ता यांना विचारणा केली असता आपण योग्य त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे आपले मत व्यक्त केले आहे, तसेच त्यांना वस्तुस्थिती काय होती हेही निदर्शनास आणून दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा