माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणास बुधवारी कलाटणी मिळाली. सुनंदा पुष्कर यांचा शवविच्छेदन अहवाल तयार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी आपल्याला न्यायवैद्यक अहवालात फेरफार करण्यास भाग पाडले गेले असल्याचा आरोप करीत एकच खळबळ उडवून दिली. अखेर केंद्र सरकारनेही या प्रकरणी तपशीलवार अहवाल सादर करावा असे आदेश ‘एम्स’ रुग्णालयास दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘एम्स’ रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी आरोग्य विभागाला पत्र लिहून आपल्या बढतीविषयी विनंती केली होती. मात्र मंगळवारी रात्री दूरचित्रवाहिन्यांनी या पत्रात काही विशिष्ट आरोप करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले, त्यामुळे या प्रकरणी ‘एम्स’कडून तपशीलवार अहवाल मागविण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.
डॉ. सुधीर गुप्ता हे एम्स रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी केलेल्या विधानांमुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विधानांबाबत गुप्ता यांना विचारणा केली असता आपण योग्य त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे आपले मत व्यक्त केले आहे, तसेच त्यांना वस्तुस्थिती काय होती हेही निदर्शनास आणून दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण
१७ जानेवारी २०१४ रोजी दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ५२ वर्षीय सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या. या दुर्घटनेच्या केवळ दोनच दिवस आधी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांनी सुनंदा यांचे पती शशी थरूर यांच्याबाबत वादग्रस्त ट्विप्पणी केली होती. त्यावरून सुनंदा आणि मेहेर तरार यांच्यात ‘ट्विटर खडाजंगी’ झाली होती. त्यामुळे सुनंदा यांच्या मृत्यूभोवती संशयाचे धुके जमा झाले होते.
एम्सने आरोप फेटाळले
पुष्कर यांच्या शवविच्छेदन अहवालात फेरफार करण्यासाठी आपल्यावर दडपण आणले जात होते, असे एम्सच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी केलेले आरोप निराधार आणि तथ्यहीन असल्याचे एम्स रुग्णालयाने म्हटले आहे. गुप्ता यांच्यावर कोणतेही दडपण होते किंवा कसे याबाबत रुग्णालय प्रशासनास फारशी माहिती नाही. मात्र जर खरोखरीच त्यांच्यावर बाहेरून दडपण आणले गेले असेल तर त्यांनी त्याविषयीचे पुरावे सादर करावेत, असे आवाहन एम्सचे प्रवक्ते अमित गुप्ता यांनी केले आहे.
थरूर आणि डॉक्टरांची पुन्हा चौकशी
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी एम्सचा अहवाल आल्यानंतर गरज भासलीच तर माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर आणि एम्सच्या न्यायवैद्यक विभागातील डॉक्टरांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहे.
लवकर सत्य बाहेर येऊ दे
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना डॉ. सुधीर गुप्ता यांच्या आक्षेपांविषयी विचारणा केली असता या प्रकरणाची सर्वतोपरी चौकशी व्हावी आणि जे सत्य असेल ते लवकरात लवकर बाहेर यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासनही दिले.
गुप्ता यांचा आरोप
सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा शवविच्छेदन अहवाल द्यावा, यासाठी डॉ. गुप्ता यांच्यावर दबाव टाकला जात होता. मात्र असा अहवाल देण्यास गुप्ता यांचा विरोध होता. पुष्कर यांच्या शवविच्छेदनात त्यांच्या दोन्ही हातांवर तब्बल डझनभर जखमांच्या खुणा आढळल्या, तसेच गालांवरही काही खुणा दिसत होत्या. त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यावर चावा घेतल्याच्या – दातांच्या खुणाही स्पष्ट दिसत होत्या. त्यामुळेच शवविच्छेदनानंतर पुनर्तपासणीसाठी सीएफएसएलकडे काही नमुने पाठविण्यात आले. त्यांच्या अहवालात ‘अमली पदार्थामुळे विषबाधा झाल्याचे’ नमूद करण्यात आले, मात्र या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल नोंदविण्यासाठी तो अहवाल पुरेसा स्पष्ट नव्हता. अल्प्राझोलम आणि एक्स्रिडीन असे दोन अमली पदार्थ पुष्कर यांच्या पुनर्तपासणीत आढळले होते. या प्रकरणाचा तपास प्रथम गुन्हे शाखेकडे न वंतर पुन्हा दिल्ली पोलिसांकडे देण्यात आला होता. विवाहानंतर सात वर्षांच्या आत पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले.