एफबीआयच्या प्राथमिक अहवालातील माहिती
शशी थरुर यांची लाय डिटेक्टर चाचणी करणार?
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा थरूर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी एफबीआयच्या न्यायवैद्यक विभागाचा अहवाल हाती आला असून त्यात त्यांना किरणोत्सर्गी द्रव्य घातल्याचे दिसून आलेले नाही. सुनंदा थरूर यांना पोलोनियम किंवा इतर किरणोत्सारी द्रव्य घालून ठार केल्याची शंका होती, त्यामुळे नमुने अमेरिकेत पाठवण्यात आले होते. त्यांना किरणोत्सारी द्रव्य घालून ठार मारल्याची शक्यता एफबीआयच्या अहवालात फेटाळण्यात आली आहे.
काही वृत्तवाहिन्यांच्या मते आता शशी थरूर यांची लाय डिटेक्टर टेस्ट (सत्य शोधन चाचणी) केली जाणार आहे. एफबीआयने त्यांचा अहवाल इमेलने पाठवला असून सविस्तर अहवाल अजून येणे बाकी आहे, असे दिल्लीचे पोलिस प्रमुख बी.एस.बस्सी यांनी वार्ताहरांना सांगितले. अंतिम अहवाल आल्यानंतरच पुढील कृतीची दिशा ठरवली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी खास पथक स्थापन केले होते. सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील एका आलिशान हॉटेलात संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांना विष घालण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले होते.
महत्त्वाचे धागेदोरे हाती..
बस्सी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, सुनंदा यांच्या मृत्यूची काही कारणे लवकरच उघड केली जाणार आहेत. सुनंदा यांचा मृत्यू पोलोनियमने झाला नसला तरी त्यांना कुठले विष घालण्यात आले हे अहवालात दिलेले आहे, पण ते आपण आताच सांगणार नाही. आता विशेष पोलिस पथक ते विष विकत कुठून आणले व सुनंदा यांना कसे दिले गेले याचा तपास करणार आहे. शशी थरूर यांची पाकिस्तानी मत्रीण असलेल्या पत्रकार मेहर तरार यांच्याशी सुनंदा यांचे ट्विटरवर भांडण झाले होते. त्यानंतर सुनंदा यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात सुनंदा यांना किरणोत्सारी समस्थानिके घालण्यात आल्याचे म्हटले होते.