माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असल्याचा अहवाल एम्स रुग्णालयाने दिल्ली पोलिसांना दिला आहे.
पुष्कर यांचा शवविच्छेदनाचा अखेरचा अहवाल एम्सच्या डॉक्टरांनी दिल्ली पोलिसांना सुपूर्द केला. यामध्ये तीन डॉक्टरांनी पुष्कर यांच्या शवाचे पुन्हा विच्छेदन केल्यानंतर शरीरीता विष आढळून आले मात्र, हे विष कोणत्या प्रकराचे आहे ते अद्याप सांगण्यात आलेले नाही. सोबत सुनंदा पुष्कर यांचे सर्व अवयव चांगले होते त्यामध्ये कोणताही विकार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याआधीच्या अहवालात पुष्कर यांचा मृत्यू विषाबाधेमुळे झाल्याचे सांगण्यात आले होते त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आणि पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यात आले.
दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर त्यांच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. डॉक्टरांच्या अहवालानंतरही पुष्कर यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.