तिरूअनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी सोमवारी चार तास जाबजबाब घेण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने घेतलेल्या या जाबजबाबत त्यांना पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यावरून सुनंदा व शशी थरूर यांच्यात झालेली भांडणे व सुनंदाचा गूढ मृत्यू याबाबत प्रश्न विचारण्यात आले. सायंकाळी ८ वाजता सुरू झालेले जाबजबाब मध्यरात्रीनंतर संपले; नंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे न देता ते वाहनात बसून निघून गेले. दरम्यान, थरूर यांचे आणखी जबाब होणार असून मेहर तरार यांचे एकदोन दिवसांत जाबजबाब होतील असे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनीही जाबजबाबासंदर्भात काही सांगितले नाही. थरूर यांच्या जाबजबाबाचा हा पहिला टप्पा होता व आणखी अनेक वेळा त्यांना बोलावले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. माजी मंत्री थरूर यांना सुनंदाच्या शरीरावर असलेल्या १५ जखमांबाबत विचारण्यात आले. त्यातील जखम क्रमांक १० ही इंजेक्शनची होती, असे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. त्यावरून सुनंदा यांना विष तोंडावाटे किंवा इंजेक्शनने देण्यात आले असावे, असा अंदाज आहे.
तिरूअनंतपुरम ते दिल्ली विमानात १५ जानेवारीला नेमके काय भांडण या दोघांमध्ये झाले होते. त्यानंतर सुनंदा यांनी लीला पॅलेस गाठले, त्याबाबत विचारण्यात आले. सुनंदा यांना एखादा रोग होता का, त्या कुठली औषधे घेत होत्या. त्यांच्याकडे अल्प्रॅक्सच्या गोळ्यांचे रिकामे पाकिट सापडले. त्या गोळ्या कुणी खाल्ल्या कारण व्हिसेरामध्ये चाचण्या नकारात्मक आल्या आहेत. सुनंदा यांना ल्युपस हा त्वचेचा विकार होता का असेही विचारण्यात आले. शशी थरूर जाबजबाबांनी वैतागलेले होते. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी खुनाची नोंद करण्यात आली असून त्यात कुणालाही आरोपी करण्यात आलेले नाही. वैद्यकीय अहवालानुसार त्यांचा मृत्यू हा विषबाधेने झालेला होता. थरूर यांचे पोलिसांनी प्रथमच जाबजबाब घेतले. सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारीला लीला पॅलेस येथे मृत्यू झाला.
चौकशी पथकात दक्षिण दिल्लीचे पोलिस उपआयुक्त प्रेमनाथ, अतिरिक्त पोलिस आयुक्त पी.एस. कुशवाह व इतर तीन अधिकारी होते. थरूर यांनी निळा शर्ट व काळे जॅकेट घातले होते. दक्षिण दिल्लीत वसंत विहार विभागात वाहन दरोडा विभागात त्यांचे जाबजबाब घेण्यात आले होते. त्यासाठी त्यांना आधी नोटीस देण्यात आली होती. थरूर यांनी लोधी इस्टेट येथे त्यांच्या वकिलांची भेट घेतली होती व विशेष चौकशी पथकाने प्रश्न विचारले, तेव्हा अनेकदा थरूर भावविवश झाले. माजी केंद्रीय मंत्री थरूर यांचे, त्यांचा नोकर नारायण याने दिलेल्या माहितीप्रमाणे, आणखी एका महिलेचे संबंध होते व तिचे नाव पती-पत्नीच्या भांडणात नेहमी येत असे, त्याबाबतही विचारण्यात आले. सुनंदाला शेवटचे केव्हा पाहिले व १७ जानेवारीच्या रात्री लीला पॅलेसच्या खोलीत त्या मृत्युमुखी पडण्यापूर्वी नेमके काय झाले होते याचीही विचारणा करण्यात आली. अ.भा.काँग्रेस समिती अधिवेशनाच्या ठिकाणी कधी गेला होतात. सुनंदाने त्यांच्या फोन कॉलला प्रतिसाद दिला नाही, तेव्हा त्यांनी काय केले असेही विचारण्यात आले. दुबई भेट व मेहर तरार यांच्याशी झालेली भेट तसेच १६ व १७ जानेवारी दरम्यानच्या रात्री झालेली भांडणे, खोलीतील फुटलेल्या काचा, सुनंदा यांच्या अंगावरील जखमा याबाबत विचारण्यात आले. हॉटेलमध्ये त्यांना नेमके कोण भेटले होते, असे प्रश्न विचारण्यात आले. आता त्यांचे जाबजबाब गेल्या वर्षी त्यांनी विशेष जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबांशी जुळवून पाहिले जातील व त्यातील विसंगती शोधल्या जातील.
सुनंदा यांचा मृत्यू लीला पॅलेस येथे १७ जानेवारीला गेल्या वर्षी झाला होता. त्याआधी मायक्रो ब्लॉगिंग संकेतस्थळ ट्विटरवरून मेहर तरार यांच्याशी सुनंदा यांचे भांडण झाले होते व त्यात त्यांनी थरूर यांच्याशी संबंध असल्याचा आरोप मेहेर तरार यांच्यावर केला होता. थरूर यांच्या घरातील नोकर नारायण सिंग, कौटुंबिक मित्र संजय दिवाण, हॉटेल कर्मचारी व व्यवस्थापक यांचेही जबाब महत्त्वाचे ठरणार आहेत.
शशी थरूर यांचे चार तास जबाब
तिरूअनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी सोमवारी चार तास जाबजबाब घेण्यात आले.
First published on: 20-01-2015 at 02:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunanda pushkar murder shashi tharoor cooperative