काँग्रेस खासदार व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक आणि विषप्रयोगाने झाल्याच्या वैद्यकीय अहवालाचा आधार घेत दिल्ली पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अद्याप कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मात्र, या प्रकरणी शशी थरूर यांची चौकशी होण्याची शक्यताही फेटाळण्यात आलेली नाही.
५१ वर्षांच्या सुनंदा यांचा १७ जानेवारीला एका आलिशान हॉटलमध्ये मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा अहवाल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने दिला होता. त्याचाच आधार घेत दिल्ली पोलिसांनी कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुनंदा यांनी विष स्वत:हून घेतले की त्यांना जबरदस्तीने इंजेक्शन देण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  
दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी मंगळवारी पत्रकारांना ही माहिती दिली. एक वर्षांने गुन्हा का दाखल केला, असे विचारले असता बस्सी यांनी सांगितले, की विषाचे स्वरूप व मात्रा नेमकी किती होती हे तपासण्याच्या चाचण्या भारतात होत नाहीत. त्यामुळे ते नमुने परदेशात पाठवण्यात आले होते. आता खुनाचा गुन्हा दाखल केल्याने सर्व संबंधितांचे जाबजबाब घेतले जातील, साक्षीदार तपासण्यात येतील, असे ते म्हणाले.
सुनंदाची हत्या झाल्याचे समजल्यावर धक्काच बसला – शशी थरूर
सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे समजल्यावर आपल्याला धक्काच बसल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री आणि सुनंदा यांचे पती शशी थरूर यांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करतील, अशी अपेक्षा असल्याचे सांगून थरूर यांनी पोलीसांना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. एका निवेदनाद्वारे थरूर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पत्नीचा खून करण्यात आला असेल, असे मला कधी वाटलेच नाही. आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होऊन सत्य बाहेर यायला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader