सुनंदा पुष्कर यांच्या शवाचे आज (शनिवार) परिक्षण करण्यात आले. शव परिक्षणानंतर त्यांच्या शरिरावर काही जखमा आढळल्या आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी सुनंदा यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. मात्र, याचा खुलासा २-३ दिवसांनी शव परिक्षणाचे रिपोर्ट आल्यावरच होईल. आज (शनिवार) दुपारी 4 वाजता सुनंदा पुष्कर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एम्स हॉस्पिटलमधून पार्थिव शशी थरुर यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी नेले जाणार आहे. त्यानंतर लोधी रोडवरील स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सुनंदा यांच्या शव परिक्षणासाठी तीन वरिष्ठ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले होते. हे परिक्षण जवळपास दोन ते तीन तास चालले. सुनंदा यांच्या गुढ मृत्यूमुळे शव परिक्षणावेळीही पारदर्शकता बाळगण्यात आली होती. परिक्षणाचे व्हिडिओ शूटींग आणि छायाचित्रण करण्यात आलेआहे. दरम्यान, पोलीस हॉटेलच्या लॉबीतील सीसीटीव्ही कॅमे-यांच्या फुटेज तपासत आहेत. तसेच, हॉटेलमधील कर्मचा-यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
याआधी पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने शशी थरूर यांची प्रकृती बिघडली असून, त्यांनाही दिल्लीतील एम्स रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. थरूर यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना आयसीयूत भरती करण्यात आले होते. मात्र, आता डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आहे. पत्नी सुनंदाच्या मृत्यूनंतर थरूर रात्रभर रडत होते व सुनंदा यांच्या मृत्यूचा त्यांना जबर धक्का बसल्याचे त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunanda pushkars death police quiz hotel staff check cctv footage post mortem being filmed