काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता पण त्यांच्या शरीरात किरणोत्सारी द्रव्यही आढळलेले नाही, मात्र त्यांचा मृत्यू घातक रसायनाने झाला, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राच्या वैद्यकीय मंडळाने सुनंदा पुष्कर यांच्या व्हिसेराबाबत अमेरिकेच्या एफबीआय या संस्थेने दिलेल्या अहवालाचे विश्लेषण पोलिसांना सादर केले.

दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी सांगितले की, सुनंदा थरूर यांच्या मृत्यूप्रकरणी सर्व दृष्टिकोनातून चौकशी करण्यात येत असून त्यात लवकरच निष्कर्ष जाहीर केले जातील. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता असे आतापर्यंतच्या चौकशीत दिसत आहे, त्याचे काही पुरावेही आहेत. गेल्यावर्षी जानेवारीत दिल्ली पोलिसांनी सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राने त्यांच्या मृत्यूचे कारण विषबाधा असल्याचे सांगितले होते व नंतर व्हिसेरा तपासणीसाठी वॉशिंग्टन येथील एफबीआयच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. सुनंदा यांचा मृत्यू किरणोत्सारी द्रव्यामुळे झालेल्या विषबाधेने झाल्याचा आधीचा अंदाज होता. व्हिसेराबाबतचा अहवाल एफबीआयने दिल्ली पोलिसांना दोन महिन्यांपूर्वी पाठवला होता, त्यांच्या व्हिसेरातील प्रारण मर्यादा सुरक्षित मानकांच्या मर्यादेत होती त्यामुळे त्यांचा मृत्यू किरणोत्सारी पदार्थाने झालेला नाही.