काँग्रेस नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक असून, तो विषबाधेमुळेच झाल्याच्या निष्कर्षावर अमेरिकेच्या एफबीआय प्रयोगशाळेने पाठविलेल्या अहवालानंतर शिक्कामोर्तब झाले. दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.
सुनंदा पुष्कर यांच्या व्हिसेऱ्याचे नमुने अमेरिकेच्या एफबीआय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. एफबीआयच्या वैद्यकीय अहवालाचा अभ्यास करून एम्सच्या मेडीकल बोर्डाने अहवालाचा निष्कर्ष दिल्ली पोलिसांकडे सुपूर्द केल्याचे पोलीस आयुक्त बस्सी यांनी ट्विट केले आहे. अहवालातील प्राथमिक माहिती आणि आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार सुनंदा यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचेच स्पष्ट होत आहे, असे बस्सी यांनी सांगितले. याशिवाय, विशेष पोलीस आयुक्त(कायदा-सुव्यवस्था) दीपक मिश्रा या प्रकरणाच्या तपासणीच्या प्रगतीचा आढावा घेणार असल्याचेही बस्सी यांनी जाहीर केले आहे.
शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर जानेवारी २०१४ मध्ये दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच त्यांनी शशी थरुर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी प्रेमप्रकरण सुरु असल्याचा आरोप केला होता. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक आणि विषप्रयोगाने झाल्याच्या वैद्यकीय अहवालाचा आधार घेत दिल्ली पोलिसांनी १ जानेवारी रोजी खुनाचा गुन्हा नोंदविला होता.