देशातील सर्वच राज्यांमध्ये करोनानं मगरमिठी आवळली असून, दिल्ली, राजस्थान पाठोपाठ उत्तर प्रदेश सरकारनंही वीकेंड लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशा एकाच दिवसात २० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे लोकांनी मास्क घालावा म्हणून मोठा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात गुरुवारी दिवसभरात २० हजार ५१० रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात करोना संसर्गाचा वेग वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात रविवारी वीकेंड लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी संपूर्ण उत्तर उत्तर प्रदेशात लॉकडाउन लागू केला जाणार असून, विनामास्क फिरणाऱ्यांवरही सरकारने दंड वसूलीचा बडगा उगारला आहे.
आणखी वाचा- धोक्याचा इशारा! भारतात कोविडमुळे दररोज २ हजार २३० जणांचा होऊ शकतो मृत्यू
उत्तर प्रदेशात आता विनामास्क फिरणाऱ्यांकडून १ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. तीच व्यक्ती पुन्हा विनामास्क आढळून आल्यास १० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यव्यापी लॉकडाउनच्या काळात सर्व कार्यालयाचं निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केलं जाणार आहे. त्याचबरोबर फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार असून, इतर सर्व कार्यालये बंद राहणार आहेत.
आणखी वाचा- देशात मृत्यूचं थैमान! सलग तिसऱ्या दिवशी हजारांहून अधिक करोनाबळी
वाढती रुग्णसंख्या आणि बेडची मागणी लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारकडून नवीन कोविड रुग्णालये उभारण्यात येणार असून, स्थानिक रुग्णालयांचं रुपांतर कोविड केंद्रात करण्यास सुरू करण्यात आली आहे. प्रयागराजमधील युनाटेड मेडिकल कॉलेज पूर्णतः कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर १०८ क्रमांकाच्या निम्म्या रुग्णवाहिका कोविड रुग्णांची ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांकडेही विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचं उत्तर प्रदेश सरकारनं म्हटलं आहे.