RSS Sunil Ambekar explains Why are there no girls in Shakhas : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शाखांमध्ये मुली, तरुणी का नसतात? असा प्रश्न संघाच्या नेत्यांना नेहमीच विचारला जातो. दरम्यान, आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी यावर नुकतंच महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “संघाच्या शाखांमध्ये मुलांसह मुलींनाही सहभागी व्हायचं असल्याची कुठलीही मागणी समाजातून आलेली नाही. मुल व मुली एकत्र शाखांमध्ये सहभागी होण्याबाबत कधी लोकांनी मागणी केली नाही. परंतु, समाजातून तशी मागणी आली तर आम्ही नक्कीच त्यावर विचार करू. सामान्य जनता मुलांना व मुलींना शाखांमधील अभ्यासात, खेळात, व्यक्तिमत्तव विकासाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास अनुकूल असेल तर आम्ही नक्कीच त्यासाठी योग्य पावलं उचलू. आम्ही संघ शाखांच्या संरचनेत बदल करू”.
संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुनील आंबेकर हे इंडिया टूडे कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मुलींच्या आरएसएसच्या शाखेतील सहभागाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “संघाचे स्वयंसेवक शाखेत एकत्र येतात, शाखेने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, व्यायाम करतात, देशभक्तीपर गीते गातात, मैदानी खेळ खेळतात, भारतात खेळले जाणारे जुने सांघिक, मैदानी खेळ खेळतात, पुस्तकं वाचतात, अध्यन करतात”.
आंबेकर यांना विचारण्यात आलं की तुमच्या संघटनेत कोणत्याही वरिष्ठ पदावर महिला का नाहीत? त्यावर ते म्हणाले, “सामाजिक स्तरावर आरएसएसच्या शाखा केवळ मुलांसाठी, तरुणांसाठी आहेत. परंतु, आमची राष्ट्र सेविका समिती देखील आहे. ही संघाचीच महिला संघटना आहे. १९३० सालापासून ही संघटना संघाप्रमाणेच काम करत आहे”.
हे ही वाचा >> “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना
…तर संघाच्या शाखेत मुली देखील सहभागी होऊ शकतात
सुनील आंबेकर म्हणाले, “एखाद्या भागातील लोकांनी मागणी केली की मुली देखील मुलांबरोबर शाखेत सहभागी होऊ इच्छितात, तर आम्ही आमच्या शाखेच्या संरचनेत नक्कीच बदल करू. परंतु, आजवर अशी कुठलीही मागणी समोर आली नाही. समाजातून आजवर बदलाची मागणी आली नाही. त्यामुळे शाखेत मुली सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या नाहीत”.
“भाजपाला पूर्वी RSS ची गरज होती, आता…”, नड्डांच्या वक्तव्यावर आंबेकरांची प्रतिक्रिया
“पूर्वी भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज भासत होती, मात्र आता भाजपा स्वयंपूर्ण झाली आहे”, असं वक्तव्य भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं होतं. त्यावरही आंबेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंबेकर यांनी याला ‘फॅमिली मॅटर’ (कौटुंबिक वाद) म्हटलं आहे. ते म्हणाले, “आम्ही कौटुंबिक वाद कुटंबातच सोडवतो. सार्वजनिक मंचांवर अशा विषयांवर चर्चा करत नाही”.