पंजाब काँग्रेसचे माजी नेते सुनील जाखड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना सदस्यत्व दिले. त्यामुळे सुनील जाखड यांचे काँग्रेससोबतचे ५० वर्षांचे नाते तुटले. त्यांचे वडील बलराम जाखड हे देखील काँग्रेसचे नेते होते आणि ते केंद्रीय मंत्रीही होते. मात्र, त्यांचे पुतणे संदीप जाखड हे सध्या काँग्रेसमध्ये असून ते अबोहरचे आमदार आहेत. सुनील जाखड यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजकीय भवितव्याबाबतही चर्चा होत आहे. काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या पहिल्याच दिवशी सुनील जाखड यांनी भावनिक वक्तव्ये करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
“मी पंजाबच्या बंधुत्वासाठी लढत आहे. जे काम एके-४७ च्या गोळ्या करू शकल्या नाहीत, ते काम त्यांनी (काँग्रेस) आपल्या जिभेने करून दाखवले. त्यांनी केवळ हिंदू बांधवाचाच नव्हे तर शीख बांधवाचाही अपमान केला,” असे सुनील जाखड यांनी भाजपा पक्ष प्रवेशानंतर म्हटले आहे.
सुनील जाखड यांना पक्षाचे सदस्यत्व देताना जेपी नड्डा म्हणाले की, काँग्रेसमध्ये असतानाही ते वेगळ्या प्रतिमेचे नेते आहेत. सुनील जाखड यांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी काम केले. आज पंजाबमधील राष्ट्रवादी शक्तींमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. मला खात्री आहे की त्यांच्यासोबत भाजपा पंजाबला एका नव्या उंचीवर नेईल. यामध्ये सुनील जाखड महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
पंजाब काँग्रेस दिल्लीत बसलेल्यांनी बनवली आहे ज्यांना पंजाब, पंजाबियत आणि शीख धर्माची काहीच माहिती नाही, असे जाखड म्हणाले होते. काही दिवसांपूर्वीच सुनील जाखर यांच्यावर पक्षानं शिस्तभंगाची कारवाई करत दोन वर्षांसाठी पक्षातील सर्व पदांपासून दूर राहाण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आधीच पक्षावर नाराज असलेल्या सुनील जाखर यांनी फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं होतं. मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी न दिल्याबद्दल जाखर पक्षावर नाराज होते. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पराभवासाठी चरणजीतसिंग चन्नी यांनाच दोषी धरलं होतं.
“काँग्रेस पक्ष लांगुलचालन करणाऱ्यांनी घेरला गेला आहे. यामुळेच काँग्रेसचं नुकसान होत आहे. या लोकांनी देशभर राजकारण करावं, पण पंजाबला सोडून द्या. मला काँग्रेसच्या या परिस्थितीची कीव येते. हे चिंतन शिबीर फक्त एक औपचारिकता आहे. यातून फार काही हाती लागणार नाही”, असं जाखर यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान, पंजाब काँग्रेसचे नेते बरिंदर धिल्लन यांनी सुनील जाखड यांच्यावर हल्ला चढवत त्यांना संधीसाधू म्हटले आहे. “सुनील जाखड हे त्यांची तत्त्वे आणि स्वाभिमान आणि चारित्र्याबद्दल बोलत आहेत. आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने त्यांचा सन्मान परत येईल का? सुनील जाखड हे कधीच मास लीडर नव्हते, पण पक्षाने त्यांना हे पद देऊन त्यांना नाव दिले. पण आज पक्षाची वाईट वेळ असताना तुम्ही निघून गेलात,” असे धिल्लन म्हणाले.