Sunil Pal and Mushtaq Khan Abductions Case Main accused Arrested : कॉमेडियन सुनील पाल आणि अभिनेते मुश्ताक खान यांच्या अपहरण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी एका चकमकीनंतर या प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिसांपासून या आरोपीचा शोध घेतला जात होता. इतकेच नाही तर याच्या डोक्यावर पोलीसांनी बक्षीस देखील ठेवले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये पोलिसांनी सोमवारी माहिती दिली की, कॉमेडियन सुनील पाल आणि अभिनेते मुश्ताक मोहम्मद खान यांच्या अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. रविवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी लवी पाल (Lavi Pal) याला अटक केली, तर त्याचा साथीदार हिमांशू हा गोळीबारादरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाला.

या अपहरण प्रकरणात लवी पाल याच्यावर २५ हजार रूपयांचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते. मुश्ताक खान यांचे २० नोव्हेंबर आणि सुनील पाल यांचे २ डिसेंबर रोजी अपहरण केल्यानंतर मेरठ आणि बिजनौर पोलीसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून लवी पाल हा फरार होता.

नेमकं काय झालं?

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना आरोपी आणि त्याचा साथीदार रविवारी रात्री बिजनौरच्या मांदावर भागात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीसांनी या ठिकाणी सापळा लावला होता. लवी आणि त्याच्या साथीदार दिसल्यावर पोलीसांनी त्यांना थांबण्यास सांगितलं, मात्र आरोपींनी पोलीसांवर गोळीबार केला. यानंतर पोलीसांनी देखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, यादरम्यान लवी पाल याच्या उजव्या पायाला गोळी लागली. यामध्ये त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीसांकडून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा>> PM Modi Receives Kuwait Highest Honour: PM मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च पुरस्कार, ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ देऊन केला सन्मान

जखमी झाल्यानंतर बिजनौर पोलीसांच्या विशेष पथकाने लावी पाल याला अटक केली आहे. चकमकीदरम्यान तो जखमी झाल्यानंतर त्याला बिजनौर जिल्हा रुग्णालयात पोलीस कोठडीत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आम्हाला त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे यासह ३५,००० रुपये मिळाले आहेत. मेरठ आणि बिजनौर पोलीसांनी त्याच्या टोळीतील सहा जणांना यापूर्वीच अटक केली आहे. तसेच आत्तापर्यंत त्यांच्याकडून ४ लाख रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती बिजनौरचे एसपी संजीव बाजपेयी यांनी दिली आहे.

संजीव बाजपेयी यांनी सांगितले की लवी पाल याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, तसेच त्याची मालमत्ता देखील जप्त करण्यात येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil pal and mushtaq khan abductions case main accused in arrested after encounter marathi news rak