नवी दिल्ली: ‘ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप खालोखाल अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड यश मिळाले. या निकालातून महायुतीत सहभागी होण्याच्या आमच्या निर्णयाला लोकशाही मार्गाने कौल दिला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्षांची गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. त्यापूर्वी तटकरे यांनी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत महायुतीतील सहभागाचे समर्थन केले. ‘आम्ही महायुतीत सहभागी झालो असलो तरी, धर्मनिरपेक्ष विचार सोडलेला नाही.  केंद्र व राज्य सरकार एकाच पक्षाचे असेल तर विकासाला अधिक चालना मिळते.

कायद्याच्या चौकटीत मराठा आरक्षण

कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, अशी आमची भूमिका आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिले असते तर तेव्हाच हा प्रश्न सुटला असता, असा आरोप तटकरे यांनी केला. अजित पवार गटातील नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही. ओबीसींच्या कोटय़ातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, ही भुजबळांची भूमिका योग्य असल्याचेही तटकरे म्हणाले.

हेही वाचा >>> “अजित पवार यांच्याकडे लोकप्रतिनिधींचे बहुमत दिसत असले, तरी…”; उज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य

जातगणना झाली पाहिजे!

जातनिहाय जनगणना करण्याची गरज आहे. केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार (यूपीए) असताना जातगणना झाली होती. मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारून ओबीसींना आरक्षण दिले गेले. त्यामुळे जातगणना केली पाहिजे. सर्व समाजघटकांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत, असे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

मग, उद्धव ठाकरेंचा आजारही राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार खरोखरच डेंग्यूने आजारी होते, त्यांचा आजार राजकीय असेल तर करोनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजारही राजकीय म्हणायचा का, असा टोला तटकरेंनी हाणला.

‘महिलाविरोधी असल्याचा आरोप चुकीचा’

गेले दीड-दोन महिने संसदरत्न (सुप्रिया सुळे) माझे नाव न घेता टिप्पणी करत आहेत. माझ्याबद्दल ती व्यक्ती, ते गृहस्थ असा उल्लेख करतात. त्यांनी माझे नाव घेतले नाही तरी मी कोण हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशी टीका तटकरे यांनी केली. नव्या संसद भवनामध्ये मी मोदींचे भाषण ऐकले. त्यानंतर मी गणेश चतुर्थीला गणपती बसवण्यासाठी घरी गेलो. मुंबईला मुकेश अंबानी यांच्या घरी गेलो हे खरे आहे. महिला विधेयकाच्या चर्चेसाठी उपस्थित नसल्यामुळे मी महिलाविरोधी असल्याचा आरोप करणे योग्य नव्हे.

Story img Loader