दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. ते सध्या तिहार तुरुंगात आहेत. तुरुंगात त्यांची प्रकृती खालावली असल्याचं आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं आहे. ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केल्यापासून आतापर्यंत त्यांचं ४.५ किलो वजन घटलं आहे. केजरीवाल यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यातच त्यांचं वजन झपाट्याने कमी होत असल्यामुळे आप नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला तिहार तुरुंग प्रशासनाने म्हटलं आहे की, केजरीवाल यांची प्रकृती उत्तम आहे. तुरुंगातील कैद्यांसाठी असलेल्या वैद्यकीय पथकातील डॉक्टरांनी केजरीवालांच्या तब्येतीबाबत कोणतीही चिंता व्यक्त केलेली नाही.

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत असतानाच केजरीवाल यांनी आपच्या सर्व आमदारांसाठी एक संदेश पाठवला आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यामार्फत हा संदेश पाठवला आहे. सुनीता केजरीवाल यांनी काही वेळापूर्वी फेसबूक लाईव्ह करून हा संदेश आमदारांसह दिल्लीकरांबरोबर शेअर केला आहे.

सुनीता केजरीवाल म्हणाल्या, अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या सर्व आमदारांसाठी तुरुंगातून एक संदेश पाठवला आहे. ते म्हणाले, मी तुरुंगात आहे म्हणून माझ्या कोणत्याही दिल्लीकराला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघाचा दौरा करावा आणि लोकांना काही अडचणी आहेत का ते जाणून घ्यावं. मी केवळ शासकीय कामांबाबत बोलत नाहीये, लोकांच्या इतरही समस्या असतात, ज्या आपण सोडवायला हव्यात. दिल्लीत राहणारे दोन कोटी नागरिक हे माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबातील व्यक्ती कोणत्याही कारणामुळे दुःखी असलेली मला चालणार नाही. ईश्वर सर्वांचं भलं करो.

हे ही वाचा >> अरविंद केजरीवालांवर बलात्काराचा आरोप? प्रसिद्ध वृत्तपत्राचे कात्रण चर्चेत, अटकेचं खरं कारण काय?

केजरीवाल यांची प्रकृती खालावली?

आम आदमी पार्टीने बुधवारी (३ एप्रिल) एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, अरविंद केजरीवाल यांना मधुमेहाची गंभीर समस्या आहे. त्यांची प्रकृती बरी नसूनही ते २४ तास देशाची सेवा करत असतात. अटकेनंतर आतापर्यंत त्यांचं ४.५ किलो वजन घटलं आहे. भाजपाने त्यांचं आरोग्य अधिक धोक्यात टाकलं आहे. अरविंद केजरीवाल यांना काही झालं तर भाजपाला आपला देशच नव्हे तर देवही माफ करणार नाही.

Story img Loader